कॅरेबियन क्रिकेट आर्मीसमोर आवाज करायची जगात कोणाची टाप नव्हती, पण गावसकरांनी रचलाय इतिहास
वेस्ट इंडिजच्या संघात तोडीस तोड फलंदाज आणि गोलंदाज होते त्यामुळे एकहाती सामने संघ जिंकत होता. मात्र सुनील गावसकर यांनी आपल्या पदार्पण मालिकेत इंडिजविरूद्ध इतिहास रचला होता.
मुंबई : कॅरेबियन क्रिकेट आर्मीची सुरूवातीला दहशतच होती, त्यावेळी त्यांचा संघ सर्वात जास्त धोकादायक होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर कोणीच टिकत नव्हतं. भारतीय संघ आतासारखा मजबूत नव्हता. त्यामुळे अनेकवेळा मोठ्या संघाविरूद्ध कसोटी जिंकण्यापेक्षा ती कसोटी ड्रॉ कशी होईल अशी संघाचा प्लॅन असायचा. वेस्ट इंडिजच्या संघात तोडीस तोड फलंदाज आणि गोलंदाज होते त्यामुळे एकहाती सामने संघ जिंकत होता. मात्र सुनील गावसकर यांनी आपल्या पदार्पण मालिकेत इंडिजविरूद्ध इतिहास रचला होता.
सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पदार्पण केलं होतं. 5 कसोटी सामन्यांमध्ये 54.80 च्या सरासरीने 4 शतके आणि 3 अर्धशतकांसह 774 धावा केल्या होत्या. गावसकर यांचा हा विक्रम अजुनही कोणाला मोडता आलेला नाही. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावसकरांच्या नावावर कायम आहे.
इतकंच नाहीतर सुनील गासवकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 27 कसोटी सामन्यांमध्ये 13 शतके केली आहेत. त्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये मायकेल होल्डिंग, जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स आणि माल्कम मार्शलसारखे दर्जेदार गोलंदाज संघात होते. मात्र छिप्पाड गोलंदाजांसमोर आपल्या ‘लिटल मास्टर’ने इतिहास रचला आहे.
सुनील गावसकर यांनी एकदा-दोनदा नाहीतर तीनवेळा कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक केलं आहे. अशा प्रकारची शतके करणारे भारताचे ते एकमेव फलंदाज आहेत. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये कसोटी क्रिकेट पदार्पण मालिकमध्ये त्यांनी 124 आणि 220 त्यानंतर 1987 मध्ये पाकिस्तानविरूद्ध 111 आणि 137 त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच कोलकातामध्ये 107 आणि 182 धावा ठोकल्या होत्या.