टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच किंग, आयसीसीला दुसऱ्यांदा करावं लागलं मान्य
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सनेही हे मान्य केलं आहे. सूर्यकुमार यादवची एकदा का बॅट चालली की त्याला रोखणं कठीण आहे. याची दखल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने घेतली आहे.
मुंबई : टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार फलंदाजीला समोर असला की भल्याभल्यांना घाम फुटतो. त्याचा आक्रमक अंदाज गोलंदाजांनी पाहिला आहे. मग ते आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट. सूर्यकुमार यादव गोलंदाजांना अक्षरश: सोलून काढतो. 2023 या वर्षातही टी20 मध्ये सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. त्याची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) घ्यावी लागली. सूर्यकुमार यादवने 2023 या वर्षात जवळपास 50 च्या सरासरी आणि 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. अनेक सामन्यांमध्ये त्याने मॅच विनिंगची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीसाठी आयसीसीने टी20 मेन्स क्रिकेट ऑफ द इयर या पुरस्काराने त्याचा गौरव केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी सूर्यकुमार यादवने आयसीसी टी20 मेन्स क्रिकेट ऑफ द इयर या पुरस्कार पटकावला आहे. सूर्यकुमार यादव याने सिकंदर रझा, अल्पेस रामजानी आणि मार्क चॅपमन यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटच्या 17 डावात 48.86 च्या सरासरीने 733 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 155.95 इतका होता.
सूर्यकुमारने 2023 च्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत 112 धावांची खेळी केली होती. यात 9 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. आकडेवारीनुसार प्रत्येक तीन चेंडूनंतर एक चौकार मारला असंच म्हणावं लागेल. वर्षाअखेरीस सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली. जोहान्सबर्ग येथे दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 56 चेंडूत 100 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 42 चेंडूत 80 धावांची खेळी केली होती.
सूर्यकुमार यादव सध्या जखमी असून अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळला नाही. आता थेट आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेक विक्रम मोडीत काढले आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी सूर्यकुमार यादव फिट अँड फाईन असेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत. सूर्यकुमार यादवने 60 टी20 सामन्यात 2141 धावा केल्या आहेत. त्यात 117 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आतापर्यंत त्याने 4 शतकं आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत. यात 192 चौकार आणि 123 षटकारांचा समावेश आहे. टी20 मध्ये स्ट्राईक रेट 171.55 चा आहे.