विराट कोहलीसोबत असंच काही जमलं नाही, काय करावं लागलं याचा खुलासा सूर्यकुमार यादवने करून टाकला
आयपीएलमधील सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यातील वाद क्रीडाप्रेमींच्या स्मरणात आहे. पण आता या दोघांची गट्टी पाहता तसं काही घडलं होतं यावर विश्वास बसणार नाही. पण विराट कोहलीसोबत असंच काही सूत जुळलेलं नाही. यासाठी सूर्यकुमार यादवला बरंच काही करावं लागलं. या दोघांची जोडी टी20 फॉर्मेटमध्ये बरीच चालली आणि दोघांनी बऱ्याच धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या जोडीचा हवा तसा इम्पॅक्ट पडला नाही. पण मागच्या तीन वर्षात दोन्ही फलंदाजांनी विरोधी संघांना घाम फोडला. दोघांनी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट खेळत आहे. तर सूर्यकुमार यादव मागच्या तीन वर्षांपासून संघाचा भाग आहे. या कमी वेळेत या जोडीने अनेक विक्रमाची नोंद केली आहे. पण या जोडीमागचं गुपित आता कुठे सूर्यकुमार यादवने उघड केलं आहे. बारबाडोसमध्ये विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने याबाबत खुलासा केला आहे. ‘जेव्हा भारतीय संघात स्थान मिळालं तेव्हाच समजलं की मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहलीसोबत बॅटिंग करावी लागेल. यासाठी त्याने एक खास पद्धत अवलंबली.’
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सूर्यकुमार यादवने सांगितलं की, विराटसोबत बॅटिंग करावी लागणार हे आधीच लक्षात आलं होतं. तेव्हाच ठरवलं की स्वत:ला फिट ठेवणं गरजेचं आहे. कारण या बाबतीत विराट कोहली पुढे आहे. पूर्ण ताकदीने विराट कोहली मैदानात उतरतो. कोहली कायम गॅपमध्ये शॉट्स खेळतो आणि वेगाने दोन धावा घेतो. त्यामुळे विराट कोहलीसोबत बॅटिंग करताना स्वत:ला फिट ठेवणं खूपच गरजेचं होतं.
सूर्यकुमार यादवने यासाठी टीम इंडियाचा ट्रेनर सोहम देसाईला खास विनंती केली होती. जेव्हा विराट कोहलीचा सेशन असेल तेव्हा माझंही ठेव, अशी विनंती सूर्यकुमार यादवने केली होती. यामुळे सूर्यकुमार यादवला प्रेरणा मिळाली. अनेकदा मानसिक आणि शारिरीक थकव्यामुळे जिममध्ये ट्रेनिंग करण्याची इच्छाच होत नव्हती. पण विराटची ट्रेनिंग पाहून तो स्वत:ला ट्रेनिंगसाठी प्रेरणा मिळत होती.
टी20 वर्ल्डकप विजयात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचं योगदान मोलाचं ठरलं. एकीकडे टीम इंडियाचे विकेट झटपट पडले असताना विराट कोहलीने डाव सावरला. तर सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात फिटनेस दाखवत डेविड मिलरचा जबरदस्त झेल घेतला. यामुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला.