शाहरुखला ‘पठाण’गिरी पडली महागात, रिलीज केलेले ‘हे’ खेळाडू घालतायेत धुमाकूळ
केकेआरला आता होत असेल पश्चाताप, 'ती' चूक आता जर नाही सुधारलं तर होऊ शकतं मोठं नुकसान
मुंबई : भारतीय संघातील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना खूश केलं आहे. यामध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये युवा खेळाडूंचा दरारा पाहायला मिळाला. रनमशीन सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav), शुभमन गिल (Shubman Gill) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांनी सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या. शुबमन गिलने आताच वनडेमध्ये द्विशतक आणि टी-20 मध्ये शतकी खेळी केली. सूर्या आता जगातील टी-20 मधील नंबर एकचा बॅट्समन आहे. याआधी दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये एकाच संघामध्ये खेळत होते. केकेआरने मात्र या मॅचविनर खेळाडूंना रिलीज केलं आणि मोठी चूक केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाखाली गौतम गंभीर खेळत असताना सूर्यकुमार यादव संघात होता.
सूर्याला पहिल्यांदा मुंबई इंडिअन्सने विकत घेतलं होतं. मात्र त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. 2014 ला त्याला केकआर संघाने विकत घेतलं होतं मात्र 2018 परत त्याला मुंबईने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. सूर्यकुमार यादव केकेआरकडून खेळत असताना सहाव्या, सातव्या स्थानी खेळायला यायचा. मात्र गंभीर दुसऱ्या संघात गेल्यावर टीम मॅनेजमेंटने सूर्यकुमारलाही रिलीज केलं होतं.
सूर्याला मुंबई इंडिअन्सने आपल्या ताफ्यात दाखल केलं. वरच्या स्थानावर खेळायला संधी मिळाल्यावर त्याने संधीचं सोन केलं आणि थेट टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं. आता सूर्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज बनला असून त्याला टी-20 संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आलं आहे.
2018 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यावर शुभमन गिलला आयपीएलमध्ये केकेआर संघाने आपल्या स्क्वॉडमध्ये सामील करून घेतलं आहे. शुभमन केकेआरनंतर गुजरात टायटन्स संघाकडून खेळत असून पहिल्याच वर्षी विजेतेपदावर नाव कोरलं. चार हंगामातील 55 डावांमध्ये 1,147 धावा केल्या यामधील गुजरातकडून खेळताना 16 डावांमध्ये 483 धावा केल्या.
राहुल त्रिपाठीने 2017 साली पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना कमाल कामगिरी केली होती. 2018 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले नाही. राजस्थान रॉयल्ससाठी त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. 2020 मध्ये तो केकेआरमध्ये आला आणि सर्व काही बदलले. कोलकाताकडून त्याने 27 डावात 627 धावा केल्या. मात्र केकेआरने त्याला रिटेन केलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहुलने केलेल्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात निवड झाली. यंदाच्या वर्षी राहुलने श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये पदार्पण केलं.
दरम्यान, केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा, नितीष राणा, व्यंकटेश अय्यर आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी करत खेळाडूंनी टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे.