सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, टी 20 मध्ये मिळालं असा सन्मान
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वर्षाभरात टी 20 मध्ये केलेल्या वादळी खेळीसाठी त्याला हा सन्मान मिळाला आहे. गेल्या वर्षी त्याने खोऱ्याने धावा केल्या होत्या.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवला आणखी सन्मान मिळाला आहे. सूर्यकुमार यादव क्रीडाप्रेमींमध्ये स्काय नावाने प्रसिद्ध आहे. सूर्यकुमार यादव विजडन क्रिकेटर्स अलमनॅक 2023 साठी लिडिंग टी20 क्रिकेटर ऑफ द ईअर म्हणून सन्मान मिळाला आहे. सूर्यकुमार यादवने 30 वर्षे वय असताना 2021 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोफ्रो आर्चर चेंडूचा पहिल्यांदा सामना केला होता आणि त्या चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार ठोकला होता. हा बाउंसर चेंडू होता. मार्च 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
सूर्यकुमार यादवने वर्ष 2022 मध्ये टी 20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली. सूर्यकुमार यादवने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका वर्षात एक हजारापेक्षा जास्त धावा केल्या केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव दुसरा फलंदाज ठरला आहे. मागच्या वर्षी त्याने दोन सेंच्युरी सुद्धा ठोकल्या होत्या.
गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 षटकार मारले. त्याच्या या विक्रमाच्या आसपास एकही फलंदाज नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 31 डावांमध्ये सर्वाधिक 1164 धावा केल्या. दरम्यान, त्याने दोन शतके आणि 9 अर्धशतके झळकावली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 48 चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे 49 चेंडूत शतक झळकावले.
सूर्यकुमार यादव आयसीसी टी 20 रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 906 पॉईंट्स आहे. मोहम्मद रिझवान 811 गुणांसह दुसऱ्या, बाबर आझम 755 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवाची सुरुवातीची क्रिकेट कारकिर्द कठीण काळातून गेली आहे. दहा वर्षे स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळालं. असं असलं तरी सध्या तो चांगला फॉर्मात नसून एका एका धावेसाठी धडपड करत आहे.
हरमनप्रीतला मिळाला मान
हरमनप्रीतची कामगिरी गेल्या वर्षी चांगली राहीली आहे. तिने इंग्लंडविरुद्ध 111 चेंडूत 143 धावांची तुफानी खेळी केली होती. तसंच तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड संघाला त्यांच्यात भूमीत वनडे मालिकेत पराभूत केलं होतं. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम स्थान मिळवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता.