T20 : तिलक वर्माची वादळी खेळी, फक्त इतक्या चेंडूत मिळवून दिला विजय
Syed Mushtaq Ali Trophy 2024, Bihar vs Hyderabad: सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धत फॉर्मात असलेल्या तिलक वर्माचा झंझावात पाहायला मिळत आहे. तिलक वर्माने 6 सामन्यात 50हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. तसेच बिहारविरुद्ध वादळी खेळी करत एकतर्फी विजय मिळवून दिला आहे.
तिलक वर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. दक्षिण अफ्रिकेत टी20 मालिकेत बॅक टू बॅक शतकी खेळी केल्यानंतर देशांतर्गत सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही फॉर्म कायम आहे. तिलक वर्माने मागच्या 6 पैकी पाच सामन्यात शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत मेघालयविरुद्ध 151 धावांची खेळी केली. बंगाल विरुद्ध 51 धावा केल्या. पण राजस्थान विरुद्ध 13 धावा करून बाद झाला. पण बिहारविरुद्ध पुन्हा एकदा आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं.डावखुऱ्या तिलक वर्माने हैदराबादच्या विजयात मोलाची साथ दिली आहे. बिहारने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 118 धावा केल्या. या धावा हैदराबादने अवघ्या 75 चेंडूत पूर्ण केल्या. तिलक वर्माने 31 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. तर रायडूने 33 चेंडूत 53 धावा केल्या. तिलक वर्माने 4 षटकार आणि एक चौकार मारला. तिलक वर्माने आपल्या फलंदाजीत खूपच सुधारणा केली आहे. मागच्या काही सामन्यातील त्याची फलंदाजी पाहता त्याने चांगली फटकेबाजी केली आहे. तिलक वर्माला मिडल ऑर्डर किंवा टॉप ऑर्डरमध्ये खेळायला आवडतं.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास टाकला. तसेच त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. या संधीचं तिलक वर्माने सोनं केलं. त्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना तिलक वर्माला टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी मिळू शकते. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी बोली लावली नाही. त्यामुळे रोहित शर्मासोबत ओपनिंगला डावखुरा फलंदाज म्हणून तिलक वर्मा उतरू शकतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनसाठी उत्तम पर्याय असेल. फलंदाजीला कुठे स्थान मिळेल हा नंतरचा भाग आहे. पण फ्रेंचायझी आणि चाहते त्याचा फॉर्म पाहून नक्कीच आनंदी असतील.
तिलक वर्मा आतापर्यंत 20 टी आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात 13 डावात त्याला खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 616 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, आयपीएलमधये 38 सामने खेळला असून 29 डावात फलंदाजी आली. त्याने 1156 धावा केल्या असून यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे.