शाहीन आफ्रीदी याचा धमाका, पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट्स, तरीही टीमचा पराभव
Shaheen Shah Afridi Takes 4 Wickets notts vs warks | आशिया कप स्पर्धेआधी या घातक आणि वेगवान गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतरही टीमचा पराभवच झाला.
नॉटिंगघम | क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. इंग्लंडमध्ये टी 20 ब्लास्ट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 30 जून रोजी असंच काहीसं झालं. एका गोलंदाजाने सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवली. या बॉलरची 2 वेळा हॅटट्रिक घेण्याची संधी होती. पण बॉलरला हॅटट्रिक घेण्यात यश आलं नाही. गोलंदाजाने 4 विकेट्स घेत चांगली सुरुवात मिळवून तर दिली. मात्र संघाचा त्यानंतरही पराभव झाला.
शुक्रवारी 30 जून रोजी नॉटिंगहॅमशायर विरुद्ध वॉरविक्शायर यांच्यात ट्रेन्ट ब्रिज नॉटिंगघम इथे सामना पार पडला. या सामन्यात वॉरविक्शायरने टॉस जिंकून नॉटिंगहॅमशायर बॅटिंगसाठी भाग पाडलं. नॉटिंगहॅमशायरने टॉम मूर्स याच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 168 धावा केल्या. त्यामुळे वॉरविक्शायरला विजयासाठी 169 धावांचं आव्हान मिळालं.
वॉरविक्शायर विजयी आव्हानाचं पाठलाग करायला मैदानात आली. नॉटिंगहॅमशायरकडून पाकिस्तानाचा युवा आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने पहिली ओव्हर टाकली. शाहिनने पहिल्याच ओव्हरमध्ये दाणादाण उडवली. शाहिनने पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेत नॉटिंगहॅमशायरला कडक सुरुवात करुन दिली.
शाहिनने या ओव्हरमधील पहिल्या दुसऱ्या आणि पाचव्या सहाव्या बॉलवर लागोपाठ 2-2 असे एकूण 4 विकेट्स घेतल्या. शाहिनला एकाच ओव्हरमध्ये 2 वेळा हॅटट्रिक घेण्याची संधी होती. मात्र शाहिनला हॅटट्रिक घेण्यात अपयश आलं.
शाहिनने अशा घेतल्या 4 विकेट्स
Shaheen Shah Afridi – First Over Masterclass ?#Blast23 | #CricketTwitterpic.twitter.com/OG9BSAIOOU
— Grassroots Cricket (@grassrootscric) June 30, 2023
शाहिनने अनुक्रमे वॉरविक्शायर टीमचा कॅप्टन अॅलेक्स डेव्हिस, ख्रिस बेंजामिन, डॅन मॉसली आणि एड बर्नार्ड या चौघांना पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शाहीनने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 29 धावा देत या 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. मात्र शाहिनला पहिल्या ओव्हरनंतर एकही विकेट घेता आली नाही. या शानदार सुरुवातीनंतरही नॉटिंगहॅमशायरला पराभवाचा सामना करावा लागला. वॉरविक्शायरने पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावल्यानंतरही नॉटिंगहॅमशायरवर 2 विकेट्सने विजय मिळवला. वॉरविक्शायरने 169 धावांचं आव्हान हे 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. वॉरविक्शायरने 172 धावा केल्या.
वॉरविक्शायर प्लेइंग इलेव्हन | अॅलेक्स डेव्हिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), रॉबर्ट येट्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅन मॉसली, ख्रिस बेंजामिन, जेकब बेथेल, एड बर्नार्ड, हसन अली, हेन्री ब्रूक्स, जेक लिंटॉट आणि ऑलिव्हर हॅनन-डाल्बी.
नॉटिंगहॅमशायर प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन मुल्लानी (कॅप्टन), जो क्लार्क, अॅलेक्स हेल्स, लिंडन जेम्स, मॅथ्यू माँटगोमेरी, टॉम मूर्स (विकेटकीपर), इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, मॅथ्यू कार्टर, ऑली स्टोन आणि जेक बॉल.