T20 WC 2024 : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान एकाच गटात, या तारखेला भिडणार
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेसाठी आता फक्त 5 महिन्यांचा अवधी शिल्लक असून 20 संघ खेळणार आहेत. यासाठी एकूण चार गट असून दोन टप्प्यात सामने होणार आहे. विशेष म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.
मुंबई : आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची तयारी आतापासून सुरु झाली आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. ही स्पर्धा 1 जून ते 29 जून दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघांची निवड झाली असून पाच पाचच्या चार गटात विभागणी केली आहे. एका गटात पाच संघ खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. तसेच या ग्रुपमध्ये यूएई, कॅनडा आणि आयर्लंड या संघांची निवड झाली आहे. त्यामुळे क्रीडा चाहत्यांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने वारंवार पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने एकदा भारताला पराभूत केलं आहे. तेव्हा टीम इंडियाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर होती. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने त्या पराभवाचा वचपा काढला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे पारंपरिक प्रतिस्पर्धीही एकाच गटात आहेत. इंग्लंडने टी20 वर्ल्डकप 2022 आपल्या नावावर केला होता.
भारतीय संघाचे सामने
- भारत विरुद्ध आयर्लंड सामना 5 जूनला
- भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जूनला
- भारत विरुद्ध यूएसए सामना 12 जूनला
- भारत विरुद्ध कॅनडा सामना 15 जूनला
ग्रुप स्टेजचे सामने 1 जून ते 18 जून दरम्यान होणार आहेत. त्यानंतर सुपर 8 चे सामने 19 जून ते 24 जून दरम्यान होतील. यातून 4 संघ उपांत्य फेरी गाठतील आणि 26 आणि 27 जूनला सामने होतील. अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना गयानामध्ये, दुसरा उपांत्य फेरीचा सामना त्रिनिदादमध्ये, तर अंतिम फेरीचा सामना बारबाडोसमध्ये होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये पाच पैकी जे दोन संघ टॉपला असतील त्यांची वर्णी सुपर 8 फेरीत लागेल.
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वी टीम इंडिया अफगाणिस्तानसोबत टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल 2024 स्पर्धेला सामोरं जाणार आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपपर्यंत टीम इंडिया कशी असेल याबाबत संभ्रम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खेळण्यावर अजूनही साशंकता आहे. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार नसतील. मालिकेची धुरा कोणाकडे सोपवायची हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे पाच महिन्याच्या कालावधीत काय घडामोडी घडतील आणि कोणाकडे धुरा सोपवली जाईल याबाबत संभ्रमच आहे.