AFG: सचिनचं अफगाणिस्तानसाठी ट्विट, कॅप्टन राशिदने असं दिलं उत्तर, म्हणाला…
Rashid Khan Sachin Tendulkar: अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशचा लो स्कोअरिंग सामन्यात धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तानचं साऱ्या क्रिकेट विश्वातून अभिनंदन केलं जात आहे.
राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने 25 जून रोजी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट केला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध 115 धावांचा शानदार बचाव केला. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट विश्वातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर यानेही अफगाणिस्तानचं भरभरुन कौतुक केलं. सचिनने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या इथवरच्या प्रवासाचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सचिनच्या या पोस्टला अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याने 4 शब्दात उत्तर देत आभार मानलं आहे.
सचिनने काय पोस्ट केलेलं?
“अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांवर मात करत उपांत्य फेरीपर्यंतचा तुमचा प्रवास अविश्वसनीय ठरला आहे. आजचा विजय हा तुमच्या मेहनतीचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटतो, असंच सुरु राहू दे!”, असं सचिनने 25 जून रोजी पोस्ट केलं होतं. राशिदने ही पोस्ट रिट्विट करत सचिनचे आभार मानले आहेत.
राशिदने सचिनची पोस्ट शेअर करत आभार व्यक्त केले आहेत. “Thank you Sachin Sir”, असं म्हणत राशिदने आभार मानलेत. राशिदला या पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलंय. तसेच पुढील सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच एका नेटकऱ्याने “राशिद भाई जरा तुमच्या शेजाऱ्यांनाही (पाकिस्तानला उल्लेखून) क्रिकेट खेळायला शिकवा”, असं म्हणत पाकिस्तानला चिमटा काढला आहे.
राशिदने मानले सचिनचे आभार
Thank you Sachin Sir 🙏 https://t.co/eZjmiznWSd
— Rashid Khan (@rashidkhan_19) June 25, 2024
दरम्यान आता अफगाणिस्तानचा सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध लढत होणार आहे. हा सामना गुरुवारी 27 जून रोजी होणार आहे. सामन्याला सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.