WI vs AFG : टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात महागडं षटक, एकाच षटकात दिल्या 36 धावा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत महागडं षटक टाकण्याची नामुष्की अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला उमरझाई यावर ओढावली आहे. चौथ्या षटकात वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने धुलाई केली आणि संपूर्ण संघ बॅकफूटवर गेला. वर्ल्डकप स्पर्धेतील हे सर्वात महागडं षटक ठरलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकल्याचं दिसून आलं. कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली. तसेच डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. दोन्ही संघांनी सुपर 8 फेरी गाठली आहे. त्यामुळे साखळी फेरीतील हा सामना केवळ औपचारिक होता. पण वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी रौद्ररूप दाखवून अफगाणिस्तानच्या गोलंदांजांना सळो की पळो करून सोडलं. पहिल्या षटकापासूनचं आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडलं. पण पॉवर प्लेच्या चौथ्या षटकात मात्र कहरच झाला. अजमतुल्ला उमरझाई याने 36 धावा दिल्या आणि सामन्याचं पारडं एका बाजूला झुकल्याचं दिसून आलं. निकोलस पूरनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे अजमतुल्ला उमरझाई पुरता हैराण झाला. एका षटकात 36 धावा देण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली.
निकोलस पूरनने अजमतुल्ला उमरझाईच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला पण नो बॉल असल्याचं पंचांनी घोषित केलं. त्यामुळे फ्री हीट मिळाला. अस्वस्थ झालेल्या अजमतुल्ला उमरझाईला दुसरा पुन्हा टाकावा लागला. पण हा चेंडू वाइड टाकला आणि त्यावर चौकार आला. त्यामुळे निकोलसला फ्री हीटची आणखी एक संधी मिळाली. पण त्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार आला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर निकोलस पूरनने षटकार ठोकला. अजमतुल्ला उमरझाईच्या गोलंदाजीवर एकूण 36 धावा आल्या.
दरम्यान, वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावा दिल्या. अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकात सर्व गडी बाद फक्त 114 धावा करू शकला. वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानला 104 धावांनी पराभूत केलं. वेस्ट इंडिजचा आक्रमक पवित्रा पाहता सुपर 8 फेरीत भल्याभल्यांना घाम फोडणार असंच दिसत आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने उपांत्य फेरी गाठली तर आश्चर्य वाटायला नको.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेद मॅककॉय.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.