AFG vs IND: अफगाणिस्तान-टीम इंडिया Super 8 मॅचआधी मोठा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’
Afghanistan vs India Super 8: अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सुपर 8 मधील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.त्याआधी स्टार खेळाडूला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत साखळी फेरीतील अखेरचे काही सामने बाकी आहेत. त्यानंतर सुपर 8 फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. एकूण 20 मधून 8 संघ निश्चित होतील. तर इतर 12 संघांना परतीचा प्रवास करावा लागणार आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, यूएसए, वेस्ट इंडिज, आणि दक्षिण आफ्रिका या 6 संघांनी सुपर 8 चं तिकीट मिळवलंय. तर उर्वरित 2 जागांसाठी आता इतर संघांमध्ये जोरदार चुरस आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना हा 18 जून रोजी होणार आहे. त्यानंतर सुपर 8 फेरीला 19 जूनपासून सुरुवात होणार आहे.
सुपर 8 साठी एकूण 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि चौथा संघ (D2) ए गटात आहेत. तर बी ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, यूएसए आणि (B1) असे 4 संघ असणार आहेत. सुपर 8 मधील तिसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात होणार आहे. अफगाणिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी साखळी फेरीत आतापर्यंत 4 पैकी 3 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघ सुपर 8 मध्ये पोहचल्याने साखळी फेरीतील चौथा सामना औपचारिकता असला तरी सुपर 8 च्या पहिल्या लढतीसाठी महत्त्वाचा असणार आहे. सुपर 8 मधील पहिल्या सामन्याआधी अफगाणिस्तानला मोठा झटका लागला आहे.
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाजाला दुखापत झाल्याने सुपर 8 सामन्याआधी मुख्य संघात बदल करण्यात आला आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. मुजीबने या स्पर्धेतील साखळी फेरीत युगांडा विरुद्ध एकमेव सामना खेळला. मुजीबच्या उजव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुख्य संघात हझरतुल्लाह झझाई या राखीव असलेल्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने मुख्य संघात बदल करण्याची परवानगीनंतर राखीव खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानला मोठा धक्का
🚨 Injury rules out Afghanistan spinner.
There’s been a squad change at the #T20WorldCup 📝⬇️https://t.co/arziaF4SVe
— ICC (@ICC) June 14, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.
राखीव: सेदिक अटल आणि सलीम साफी.