वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून आला आहे. साखळी फेरीतील चार पैकी चार सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या आठ पर्वात ऑस्ट्रेलियाने सहावेळा जेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलिया सातव्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेचा अंतिम फेरी गाठण्याचा मानस आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ 2023 स्पर्धेत आमनेसामने आले होते. टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 19 धावांनी धोबीपछाड दिला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमवून 156 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डाव अडखळला. 20 षटकात 6 गडी गमवून 137 धावा करता आल्या. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी दक्षिण अफ्रिकेकडे आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने सांगितलं की, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. एक नवीन विकेट दिसते, खूप छान आणि आम्ही पाठलाग करू. पुन्हा तीच टीम घेऊन मैदानात उतरतोय. दुसऱ्या हाफमध्ये चेंडू बॅटवर चांगला येतो. आम्ही शांतपणे या सामन्यात येण्याचा आत्मविश्वास बाळगतो, तो एक दर्जेदार संघ आहे आणि मला चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हीने सांगितलं की, एक छान विकेट, झटपट आउटफिल्ड आणि बोर्डवर धावा हे नॉकआउट गेममध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात. आम्ही भारताविरुद्ध खेळलो तीच बाजू आम्ही खेळत आहोत. आज रात्री काहीही बदलणार नाही, आम्हाला बाहेर जाऊन आमच्या योजना पूर्ण कराव्या लागतील.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, बेथ मूनी (विकेटकीपर), ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वेअरहम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका