IND vs PAK : पराभवाचं विश्लेषण करताना बाबर आझमचं ततफफ! असं ढकलून दिलं सर्वकाही
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला आपला गाशा साखळी फेरीतच गुंडाळावा लागणार आहे. अमेरिकेनंतर भारताकडून पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशातला प्रवास खूपच कठीण जाणार आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमने सर्वकाही ढकलून दिलं आहे. पराभवाची कारणं सांगताना मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सुपर 8 चा मार्ग आता कठीण झाला आहे. भारत आणि अमेरिकेच्या पुढच्या कामगिरीवर आता पाकिस्तानचं सर्वकाही ठरणार आहे. त्यामुळे पुढचा प्रवास काही आपल्या हाती नाही हे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला कळून चुकलं आहे. भारताविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम गोलंदाजी घेण्याची संधी चालून आली. तसेच भारताला 19 षटकात सर्वबाद 119 धावांवर रोखता आलं. विजयासाठी मिळालेल्या 120 धावांचं आव्हान पाकिस्तान सहज गाठेल असंच वाटत होतं. भारताच्या डावात जेव्हा धडाधड विकेट पडत होत्या तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचं हसू असंच सांगत होतं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 20 षटकं पूर्ण खेळून आणि हातात विकेट असूनही पाकिस्तानला या धावा गाठता आल्या नाही. भारताने पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर बाबर आझमने सर्वकाही ढकलून दिल्याचं दिसत आहे. सामन्यातनंतरची त्याची प्रतिक्रिया आरोप करणारी ठरली.
“आमच्या गोलंदाजांनी खरंच खूप चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीत आम्ही नको ते करून बसलो. एकतर एकापाठोपाठ मोक्याच्या क्षणी विकेट्स गमवल्या. त्यात खूपच निर्धाव चेंडू गेले. त्यामुळे धावा आणि चेंडूमधलं अंतर वाढलं. खरं तर धावा करण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक होती. ती म्हणजे स्ट्राईक रोटेड करणं आणि संधी मिळाली तर चौकार मारणं. पण त्या वेळेत खूपच निर्धाव चेंडू गेले. शेपटकडच्या फलंदाजांकडून फार काही अपेक्षा नव्हती. पहिल्या सहा षटकात काय ते करायचं होतं. पण एक विकेट पडली आणि सर्व काही विस्कटलं. खेळपट्टी चांगली होती आणि चेंडूही बॅटवर येत होता. फक्त थोडी स्लो होती काही चेंडू उसळी घेत होते.” असं बाबर आझमने सांगितलं.
सुपर 8 फेरीसाठी पाकिस्तानचं गणित कसं असेल असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. तेव्हा कर्णधार बाबर आझमने सांगितलं की, “मागचे दोन्ही सामने आम्ही जिंकायला हवे होते. पण आता आम्ही बसू आणि नेमक्या काय चुका झाल्या याचं आकलन करू. पुढच्या दोन सामन्यात आम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू” पाकिस्तानचे पुढचे दोन सामने आयर्लंड आणि कॅनडा सोबत आहेत. आयर्लंडविरुद्ध पाकिस्तान स्पर्धेपूर्वीच मार खाल्ला आहे. आयर्लंडने पराभूत करून पाकिस्तानला तारे दाखवले होते. त्यामुळे आयर्लंडविरुद्धची लढत वाटते तितकी सोपी नाही.