IND vs PAK : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, या ठिकाणी भारताच्या पारड्यात पडला सामना
टीम इंडियाने विजयाचा घास पाकिस्तानच्या जबड्यातून खेचून आणला. सामन्यात एकीकडे पाकिस्तानकडे झुकला असताना शिवम दुबेच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका बसला. मात्र ही चूक जसप्रीत बुमराहने सुधारली आणि सामन्यात परत आणलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलं आहे. 120 धावांचं सोपं टार्गेटही पाकिस्तानला झेपलं नाही. एकीकडे पूर्ण सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला असताना भारतीय क्रीडाप्रेमींनी आशा सोडून दिली होती. 14 व्या षटकापर्यंत संपूर्ण सामन्यावर पाकिस्तानची पकड होती. पाकिस्तानने 14 षटकात 3 गडी गमवून 80 धावा केल्या होत्या. 36 चेंडूत 40 धावांची गरज होती आणि सात गडी हातात होतं. अशावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढलं आणि 15 वं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने सेट बॅट्समन रिझवानचा त्रिफळा उडवला. या विकेटनंतर भारतीय संघ सामन्यात परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. विकेट हाती असूनही पाकिस्तानला फक्त 33 धावा करता आल्या आणि 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
विजयासाठी दिलेली धावसंख्या कमी असल्याने रोहित शर्माला बुमराहकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे पहिल्या दोन षटकात विकेट न आल्याने रोहित शर्माने तिसरं षटक बुमराहच्या हाती सोपवलं. पहिल्या चेंडूवर रिझवानने 2 धावा घेतल्याा. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर काहीच करता आलं नाही. त्यामुळे वैतागलेल्या रिझवानने मोठा फटका मारण्याचा निर्णय घेतला. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने थेट शिवम दुबेच्या हाती होता. मात्र त्याने झेल सोडला आणि सर्व गणित फिस्कटलं. रिझवानचा झेल सोडला तेव्हा तो 7 धावांवर होता. मात्र त्यानंतर त्याने 24 आणखी जोडल्या आणि 31 धावा केल्या.
शून्यावर बाद झालेला जसप्रीत बुमराह खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो ठरला. दुसरीकडे, पाकिस्तानने हातात असलेली मॅच गमावली. त्यामुळे पाकिस्तानचा सुपर 8 फेरीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता सर्वकाही अमेरिकेच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अमेरिकेचा पुढचा सामना भारत आणि आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागेल. दुसरीकडे, भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की बस होईल. कारण भारताचा नेट रनरेट हा इतर संघांपेक्षा चांगला आहे. भारत 4 गुण आणि +1.455 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.