T20 World Cup 2024 : सुपर 8 फेरीत अमेरिकेचा लढती कोणासोबत? जाणून घ्या एका क्लिकवर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेपूर्वी दिग्गज खेळाडूंनी प्रबळ दावेदार संघांची यादी जाहीर केली होती. मात्र आता अमेरिकेची कामगिरी पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमेरिकेने अ गटातून सुपर 8 फेरी गाठली आहे.
अमेरिकेच्या क्रिकेट इतिहासात सूवर्ण अक्षरात नोंद करावी अशी घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन संघाने पहिल्यांदाच आयसीसी चषकात भाग घेतला आणि कमाल केली. खरं तर या स्पर्धेचं आयोजन अमेरिकेत करण्यात आल्याने यजमान म्हणून खेळण्याची संधी मिळाली. पण या संधीचं सोनं अमेरिकन संघाने केलं. बेसबॉल खेळणाऱ्या अमेरिकेत क्रिकेट रुजवण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना अमेरिकेने केलेल्या कामगिरीमुळे यश मिळालं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अमेरिकेने या स्पर्धेची सुरुवात कॅनडाला पराभूत करून केली. त्यानंतर पाकिस्तानला वाटलं की हा एक दुबळा संघ आहे. मात्र अमेरिकेने सुपर ओव्हरपर्यंत सामना खेचून जिंकून दाखवला. इतकंच काय तर भारतालाही विजयासाठी चांगलंच झुंजवल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मोठ्या धावसंख्या करता आल्या नाहीत. यावरून अमेरिकेच्या भेदक माऱ्याची अनुभूती होते. अशा सर्व दिव्यातून अमेरिकेने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेने सुपर 8 फेरीतही अशीच कामगिरी केली तर उपांत्य फेरी गाठू शकते.
अमेरिकेला सुपर 8 फेरीत एकूण तीन सामने खेळायचे आहेत. यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला तरी उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं होऊ शकतं. अमेरिकेचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना 19 जूनला दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यानंतर 22 जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध लढत असेल. त्यानंतर बांगलादेश किंवा नेदरलँडशी लढत होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने सुपर 8 फेरीत धडक मारल्याने पुढच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत क्वॉलिफाय करेल. 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत स्पर्धा होणार आहे. यावेळी अमेरिकेला थेट तिकीट मिळणार आहे. दुसरीकडे, सुपर 8 फेरीसाठी 6 संघ ठरले आहेत. तर दोन संघांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. ड गटातून बांगलादेश आणि नेदरलँड, तर ब गटातून स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यात चुरस आहे.
युनायटेड स्टेट्स संघ: शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (डब्ल्यू), आरोन जोन्स (क), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल, मिलिंद कुमार.