T20 World Cup : दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला हरवून रचला विक्रम, काय केलं वाचा
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील आता शेवटचे दोन सामने शिल्लक आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम फेरीचा सामना उरला आहे. दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. तसेच एक अनोखा विक्रमही नोंदवला आहे. काय ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा नवा विजेता मिळवण्यासाठी आता फक्त दोन सामन्यांचं अंतर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना झाल्यानंतर अंतिम फेरी होईल. अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णत: फसला असंच म्हणावा लागेल. कारण अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 11.5 षटकात 56 धावा करून सर्वबाद झाला. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 8.5 षटकात फक्त 1 गडी गमवून पूर्ण केलं. आता दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना आता भारत-इंग्लंड यांच्यापैकी विजेत्या संघाशी होईल. दक्षिण अफ्रिकेने या विजयासह टी20 वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला आहे. सलग विजय मिळवून अंतिम फेरी गाठणारा दक्षिण अफ्रिका हा टी20 विश्वचषकातील पहिला संघ ठरला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने आठ पैकी आठ सामने जिंकले आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील एका पर्वात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर आहे.
दक्षिण अफ्रिकेपूर्वी हा विक्रम श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 2009 विश्वचषकात श्रीलंकेने सलग सहा विजय मिळवून विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाने सलग सहा सामना जिंकून याची बरोबरी केली होती. ऑस्ट्रेलियाने या विक्रमाची 2021 मध्ये सहा विजयासह बरोबरी केली आहे. आता हे सर्व विक्रम मोडून दक्षिण अफ्रिकेने सलग आठ विजय मिळवला आहे.ऑस्ट्रेलियाने 2022-2024 यामध्ये त्याचे पहिले पाच विजय 2022 मध्ये आणि शेवटचे तीन विजय 2024 मध्ये आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम सामना जिंकल्यास नवा इतिहास रचेल. सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम करण्यासाठी आफ्रिकन संघाला विजय आवश्यक आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका अंतिम सामना जिंकून नवा इतिहास रचणार का, याची प्रतीक्षा करावी लागेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.