SUPER 8, IND vs BAN : भारत बांगलादेश सामन्यात या खेळाडूंकडे असेल विजयाची चावी! कोण आहेत ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना भारताने जिंकला तर उपांत्य फेरीचं निश्चित होईल. तसेच बांगलादेशचं आव्हानही संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यावर बरंच काही अवलंबून आहे. या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने येतील. कॅरेबियन बेटावरील अँटिगातील नॉर्थ साउंड येथे सर विवियन रिचर्ड या मैदानात हा सामना पार पडणार आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. यापूर्वी दोन्ही संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12, बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे. तर वर्ल्डकपमधील खेळलेले चारही सामने भारताने जिंकले आहेत. या सामन्यात काही खेळाडूंचं द्वंद्व पाहायला मिळणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. मागच्या 12 डावात रोहित शर्माने 37.8 च्या सरासरीने आणि 141.4 च्या स्ट्राईक रेटने 454 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे.
या सामन्यात भारताचे 8, तर बांगलादेशच्या 3 खेळाडूंवर नजर असणार आहे. भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे लक्ष असेल.तर बांगलादेशच्या शाकिब अल हसन, महमुदुल्लाह आणि मुस्तफिझुर रहमान यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. हार्दिक पांड्या आणि शाकिब अल हसन या सामन्यातील की प्लेयर ठरू शकतात. इतकंच काय तर तौहिद हृदोय, अक्षर पटेलही चमकू शकतात.
सर विवियन रिचर्ड मैदानात आतापर्यंत वर्ल्डकपचे पाच सामने झाले. यापैकी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी तीनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला की प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. या मैदानात मागचा सामना दक्षिण अफ्रिका आणि अमेरिका यांच्यात पार पडला. दक्षिण अफ्रिकेने 194 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अमेरिकेने विजयासाठी चांगली झुंज दिली. विजयी धावांचा पाठलाग करताना फक्त 18 धावा कमी पडल्या. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याचा अंदाज येतो.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल.
बांगलादेश संघ: तन्झिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहिद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, तन्झिम हसन साकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सौम्या सरकार.