Team India: रोहित शर्मा हार्दिक-सूर्यकुमारबाबत भरभरुन बोलला, चाहत्यांची जिंकली मनं
Rohit Sharma On Hardik Pandya: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये मनोगत व्यक्त केलं. रोहितने या दरम्यान खूप काही सांगितलं.
टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहितसेना दिल्लीनंतर मुंबईत आली. दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईला संध्याकाळी पोहचली. त्यानंतर रोहितसेना मरीन ड्राईव्हच्या दिशेने आली. त्यांनतर टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. जवळपास 2 तास ही विजयी मिरवणूक चालली. त्यांनतर टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये येताच डान्स केला. राष्ट्रगीत पार पडल्यानंतर कौतुक समारंभाला सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भरभरुन प्रतिक्रिया दिली. रोहितने दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या वर्ल्ड कप फायनलबाबत प्रतिक्रिया दिली.
कॅप्टन बोलायला येताच वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांनी “रोहित रोहित”, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. क्रिकेट चाहते इतके उत्साही झाले की रोहितला त्यांना हात दाखवून थांबायला सांगावं लागलं. रोहितने चाहत्यांचे आभार मानले आणि बोलायला सुरुवात केली. त्यानंतर रोहितने दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या सामन्यातील हार्दिक पंड्याने टाकलेल्या ओव्हरचा उल्लेख केला. तसेच सूर्यकुमार यादव याने 20 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलर याचा घेतलेल्या रिले कॅचचा उल्लेख केला. तसेच रोहितने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत आवर्जून सांगितलं.
रोहित काय म्हणाला?
“ही ट्रॉफी संपूर्ण देशासाठी आहे”, असं रोहितने म्हटंल. तसेच रोहितने हार्दिकच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यानंतर साऱ्या स्टेडियममध्ये हार्दिक हार्दिक अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सूर्याच्या कॅचचा उल्लेख करताच ‘मिस्टर 360’ च्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. सूर्याच्या हास्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अखेरीस प्रेझेंटेटर गौरव कपूर याने रोहितला हिंदीत प्रश्न विचारला. उपस्थित क्रिकेट चाहत्यांबाबत गौरवने हा प्रश्न विचारला. तेव्हा रोहितने मी या चाहत्यांचा आभारी असल्याचं म्हटलं. तसेच रोहितने वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभावाचा उल्लेख केला. आमच्यापेक्षा क्रिकेट चाहत्यांना तो पराभव जिव्हारी लागला असल्याचं रोहितने म्हटलं. मात्र आता आम्ही वर्ल्ड कप जिंकला आहे. हा वर्ल्ड कप देशवासियांचा आहे. मला आता माझ्यावरुन मोठा भार हलका झाल्यासारखं वाटतंय. मी फार आनंदी आहे. मला या संघांचं नेतृत्व करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे, असंही रोहितने म्हटलं.