टी 20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. टीम इंडिया आज 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता बारबाडोसहून नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे विमानतळावरुन आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहचली. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर टीम इंडिया निवासस्थानातून मुंबईच्या दिशेने निघाली. आता मुंबईकर चाहत्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रतिक्षा आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झालेली आहे. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत खास सोहळा पार पडणार आहे. एमसीए आणि बीसीसीआयने वानखेडे स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री ठेवली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. स्टेडियममध्ये टीम इंडियाचा कॅप्टन लोकल बॉय रोहित शर्मा याच्या नावाचा जयघोष पाहायला मिळतोय. दुपारी साडे चारच्या दरम्यान वानखेडे स्टेडियमचा अर्धा भाग हा चाहत्यांनी व्यापला आहे. “मुंबईचा राजा रोहित शर्मा”, अशा घोषणा क्रिकेट चाहते देत आहेत.
दरम्यान टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची यंदाची दुसरी वेळ ठरली. टीम इंडियाने 2007 साली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानतंर आता 17 वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित 2007 च्या वर्ल्ड कप टीममध्ये एक खेळाडू होता, मात्र यंदा त्याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2 टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. रोहित साऱ्या भारताचा लाडका आहे. मात्र तो मुंबईकर असल्याने त्याच्यावर मुंबईकरांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे रोहितसाठी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.
“मुंबईचा राजा रोहित शर्मा”
Rohit Sharma chants in Wankhede stadium. 🥶🔥 pic.twitter.com/AzojNUI1Na
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची हजेरी
दरम्यान अनेक चाहते वानखेडे स्टेडियममध्ये गेले आहेत. तर ज्यांना आपल्या टीम इंडियाला ओपन डेक बसमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसह पाहायचंय, ते मरीन ड्राईव्ह येथे समुद्रकिनारी उभे आहेत. इथे पावसाने जोरदार हजेरी लावलीय. मात्र त्या पावसातही क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहात काडीमात्र फरक पडलेला नाही. आता क्रिकेट चाहत्यांना फक्त नि फक्त टीम इंडियाची प्रतिक्षा आहे.