T20 World Cup : साखळी फेरीतूनच दोन दिग्गज संघाचा पत्ता कापला, दुबळा समजला जाणारा संघ सुपर 8 फेरीत
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. सुपर आठ फेरीसाठी काही संघांचं जर तरचं गणित आहे. तर क गटाचं पूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. या गटातून दिग्गज संघांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण 20 संघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढाओढ सुरु होती. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून जर तरची लढाई सुरु झाली आहे. अ गटातून भारताने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर दुसऱ्या संघासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात चुरस आहे. तर आयर्लंडला संधी आहे पण मार्ग कठीण आहे. दुसरीकडे, ब गटातील लढाई रंगतदार वळणावर आली आहे. या गटातून ऑस्ट्रेलियाने पात्रता फेरी गाठली आहे. पण दुसऱ्या संघासाठी स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यात चुरस आहे. ही लढाई इतक्या रंगतदार वळणावर आली आहे की काय होईल सांगता येत नाही. स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना जिंकला तर स्कॉटलँड सुपर 8 फेरी गाठेल. जर हरला तर मात्र इंग्लंडला संधी मिळू शकते.
क गटाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. या गटातील प्रत्येक संघाचा एक एक सामना शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच दोन संघांनी सुपर 8 फेरी गाठली आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघांनी या गटातून पुढे कूच केली आहे. तर न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघाचा पत्ता कापला गेला आहे. न्यूझीलंसोबत पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे देशही बाद झाले आहेत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी 3 सामने जिंकत सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे.
ड गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर श्रीलंकेचं तीन सामन्यातच आव्हान संपुष्टात आलं आहे. या गटातून दुसऱ्या संघासाठी बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ या संघात चुरस आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशला सुपर 8 फेरीची सर्वाधिक संधी आहे. एकंदरीत सुपर 8 फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी धडक मारली आहे. तर उर्वरित तीन संघांबाबत उत्सुकता वाढली आहे. सुपर 8 फेरीचे सामने 19 जूनपासून सुरु होणार आहेत. 25 जूनपर्यंत हा थरार रंगेल. यातून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत.