मोहम्मद शमीबाबत काय तो कॉल घ्या! माजी बॉलिंग कोचने गौतम गंभीरसह स्टाफला दिला थेट सल्ला
मोहम्मद शमी हा भारतीय वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील एक महत्त्वाचं अस्त्र आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची जादू दिसून आली आहे. दुखपतीमुळे मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे. अशा स्थितीत त्याचं संघात पुन्हा कसं आणि कधी पुनरागमन होणार हा प्रश्न आहे. याबाबत आता माजी बॉलिंग कोचने गौतम गंभीरसह नव्या कोचिंग स्टाफला आधीच एक सल्ला दिला आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर मोहम्मद शमीची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे. आता टीम इंडियात त्याचं पुनरागमन कधी होणार? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. असं असताना शमीने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात शमी पुनरागमनासाठी मेहनत करताना दिसत आहे. पण असं सर्व होत असताना माजी बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे याने शमीबाबत थेट सल्ला दिला आहे. नवनियुक्त प्रशिक्षक गौतमम गंभीर यांनी शमीसोबत बसून त्याच्या भविष्याचा निर्णय घ्यावा असं सांगितलं आहे. मोहम्मद शमीचं वय 33 असून फिटनेसमध्ये त्याची गाडी अजून किती पुढे जाते हा देखील प्रश्न आहे. पारस म्हाम्ब्रेच्या मते, या वर्षाच्या शेवटी गावस्कर बॉर्डर ट्रॉफी असून त्यापूर्वी मोहम्मद शमीला काही सामने खेळवणं गरजेचं आहे. नव्या स्टाफने शमीसोबत चर्चा केली पाहीजे. तसेच त्याला नेमकं काय करायचं ते विचारायला हवं, असंही पारस म्हाम्ब्रे पुढे म्हणाला.
“मोहम्मद शमी आता तरूण राहिलेला नाही. मग प्रश्न असा आहे की, शमी कुठे फिट होतो. तसेच आणखी किती वर्षे खेळणार. त्याचा वापर किती हुशारीने करता? मला विश्वास आहे की गौतम गंभीरसोबत स्टाफमध्ये जो कोण येईल तो शमीकडून चांगलं ते काढून घेईल.”, असं पारस म्हाम्ब्रेने टेलिग्रामशी बोलताना सांगितलं. “जर कसोटीवर लक्ष केंद्रीत करत असाल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजपूर्वी त्याला आकार दिला पाहीजे. या दौऱ्यापूर्वी त्याला काही क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण त्याला क्रिकेटपासून ब्रेक घेऊन बराच काळ उलटला आहे.”, असं पारस म्हाम्ब्रेने सांगितलं.
कसोटी टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारत तीन मालिका खेळणार आहे. यात बांग्लादेश विरुद्ध दोन सामन्यांची मालिका, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत टॉपला आहे. पण इतर संघही शर्यतीत आहेत हे विसरून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मोहम्मद शमी आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळला असून 229 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे.