Abhishek Sharma ची करियर बेस्ट कामगिरी, Icc रँकिंगमध्ये थेट दुसर्या स्थानी, वरुण चक्रवर्तीचाही धमाका
Icc T20i Batting And Bowling Ranking : आयसीसीने जारी केलेल्या टी 20i रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी तर धमाका केला आहे.

टीम इंडियाने इंग्लंडवर वानखेडे स्टेडियममध्ये पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 150 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने त्या सामन्यात 135 धावांची झंझावाती खेळी केली होती. अभिषेकने त्या खेळीत 13 षटकार आणि 7 चौकार लगावले होते. अभिषेकला त्याच्या या खेळीचा जबरदस्त फायदा झाला आहे. अभिषेकने आयसीसी टी 20i बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तसेच मॅन ऑफ द सीरिज ठरलेला टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी यालाही बॉलिंग रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. त्यामुळे आयसीसीच्या या टी 20i रँकिंमध्ये टीम इंडियाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
अभिषेकची सर्वोत्तम कामगिरी
अभिषेक शर्मा याने त्याच्या छोट्याशा कारकीर्दीत मोठी कामगिरी केली आहे. अभिषेकने करियर बेस्ट कामगिरी करत या रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अभिषेकने तब्बल 38 जणांना मागे टाकत दुसऱ्या स्थानाला गवसणी घातली आहे. अभिषेकच्या खात्यात 829 रेटिंग पॉइंट्स आहेत. त्यामुळे आता पहिल्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याचं टेन्शन वाढलं आहे. हेड आणि अभिषेक या दोघांमध्ये फक्त 26 रेटिंगचा फरक आहे. ट्रेव्हिस 855 रेटिंगसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.
टॉप 10 मध्ये कोण?
तसेच अभिषेकचा अपवाद वगळता टॉप 10 मध्ये टीम इंडियाच्या दोघांचा समावेश आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे दोघे टॉप 10 मध्ये आहेत, मात्र दोघांना प्रत्येकी 1-1 स्थानाचं नुकसान झालं आहे. अभिषेकने पछाडल्याने तिलकची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर सूर्या चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी पोहचला आहे. तर यशस्वी जयस्वाल 12 व्या क्रमांकावरुन 15 व्या स्थानी गेला आहे. यशस्वीची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत निवड करण्यात आली नव्हती.
टीम इंडियाचा टी 20i रँकिंगमध्ये जलवा
India star surges a whopping 38 places to the No.2 spot in the ICC Men’s Player Rankings 🤯
Full details from the latest update 👇https://t.co/TOX0nyxJlI
— ICC (@ICC) February 5, 2025
वरुण चक्रवर्तीची चमकदार कामगिरी
वरुण चक्रवर्तीने 3 स्थानांची झेप घेतली आहे. वरुण यासह बॉलिंग रँकिंमध्ये संयुक्तरित्या तिसऱ्य स्थानी आहे. वरुणच्या खात्यात 705 रेटिंग आहेत. तर रवी बिश्नोईने 4 स्थानांची झेप घेतल्याने तो 10 व्या वरुन 6 व्या क्रमांकावर आला आहे. रवीचे 671 रेटिंग आहेत. तर अर्शदीप सिंह आठव्या क्रमांकावपुन नवव्या स्थानी घसरला आहे.