Tilak Varma | तिलक वर्मा याला लॉटरी! वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये मिडल ऑर्डरची जबाबदारी?
Tilak Varma Icc World Cup 2023 | आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. विंडिजने टीम इंडियावर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला. विंडिजने टीम इंडिया विरुद्ध 2016 नंतर पहिल्यांदाच टी 20 मालिका जिंकली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होती. मात्र टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारत मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. मात्र पाचव्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं.
या टी 20 मालिकेतील कामगिरीमुळे टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वावरही टीका करण्यात आली. या टी 20 मालिकेत टीम इंडियासाठी एकच बाब सकारात्मक राहिली ती म्हणजे तिलक वर्मा. तिलक वर्मा या 20 वर्षाच्या तरण्याबांड खेळाडूने विंडिज विरुद्धची टी 20 मालिका गाजवली. तिलक वर्मा याने याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तिलकने इतकी भारी कामगिरी केली की त्याचं नाव थेट आगामी वर्ल्ड कपसाठी घेतलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने चौथ्या स्थानाबाबतची चिंता व्यक्त केली होती. मात्र विंडिजने विरुद्धच्या मालिकेतून तिलक वर्मा याने चौथ्या स्थानासाठी दावेदारी सिद्ध केली. तिलकने विंडिज विरुद्ध पार पडलेल्या टी 20 सीरिजमधील 5 सामन्यात 57.67 च्या सरासरीने 173 धावा केल्या. या दरम्यान तिलकने पहिलंवहिलं अर्धशतकही ठोकलं. तिलकने या कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
तिलक वर्मा
Tilak Varma emerges as the likely contender for the 2023 World Cup for the middle order slot. (PTI). pic.twitter.com/7FatDkQT7u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 14, 2023
टीम इंडियाला आता आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका आणि आशिया कप खेळणार आहे. आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका असणार आहे. या मालिकेसाठी तिलकची निवड करण्यात आली आहे. तर आशिया कपसाठी अजून भारतीय संघाची घोषणा व्हायचीय. त्यामुळे निवड समिती तिलक वर्मा याचा कसा उपयोग करुन घेते, हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.