टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुलेचं मोठं विधान, म्हणाला..

| Updated on: Aug 03, 2024 | 5:25 PM

टीम इंडियात गंभीर पर्व सुरु झाल्यापासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. टी20 क्रिकेटमध्ये या प्रयोगांची अनुभूती आली. आता वनडे क्रिकेटमध्येही काही बदल पाहायला मिळत आहेत. या बदलांना गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यानेही दुजोरा दिला आहे. तसेच भविष्याचा वेध घेत मोठं विधान केलं आहे.

टीम इंडियाचा गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुलेचं मोठं विधान, म्हणाला..
Image Credit source: Instagram
Follow us on

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांची रंगत वाढली आहे. असं असताना पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियात काही प्रयोग पाहायला मिळाले. त्याची चर्चा आता क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी स्पष्ट केलं की, टॉप ऑर्डर फलंदाजांना गोलंदाजीची संधी दिली जाईल. ही रणनिती विरोधी संघावर प्रभावीपणे काम करू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुबमन गिलला गोलंदाजी सोपवली होती. त्याने एका षटकात 14 धावा दिल्या. असं असूनही अशी रणनिती भविष्यात अंमलात आणली जाईल, असं साईराज बहुतुले याने सांगितलं. ‘मला वाटते की आमचे फलंदाजही चांगली गोलंदाजी करू शकतात. फलंदाजीत चांगलं करत असल्याने अनेकदा ते गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत नाहीत. पण त्यांच्याकडे गोलंदाजीचं कौशल्य आहे विसरून चालणार नाही.’, असं साईराज बहुतुले याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

बहुतुलेने यासाठी टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव आणि रिंकु सिंहचं उदाहरण दिलं. “तुम्ही पाहिलं असेल की रिंकु आणि सूर्याने गोलंदाजीत चांगलं योगदान दिलं आहे. त्यामुळे येथे शुबमन गिलला संधी देण्यात आली. आगामी काळात हा अष्टपैलू खेळाडूंचा खेळ असणार आहे.”, असं बहुतुले याने सांगितलं. ‘वरच्या फळीतील एक दोन फलंदाजांनी गोलंदाजी केली तर निश्चितच संघाला मदत होईल. अर्थातच खेळपट्टीच्या परिस्थितीवर आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.’, असं त्याने पुढे सांगितलं.

श्रीलंकन फिरकीपटूंनी खेळपट्टीच्या स्थितीचा वापर केला, याची कबुली साईराज बहुतुले याने दिली. .”मला वाटतं खेळपट्टीचे स्वरूप आणि त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती कौतुकास्पद आहे. हसरंगा आणि असलंका यांनी त्यांचे कौशल्य उत्तम प्रकारे वापरले.” श्रीलंकेचा कर्णधार आणि ओपनर चरिथ असलंकाने 8.5 षटकं टाकली. तसेच 30 धावा देत 3 गडी बाद केले. शेवटी सलग दोन विकेट घेत सामना बरोबरीतही सोडवला. यात शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग याची विकेट होती.