मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. एका पाठोपाठ एक अशा पाच संघांना पराभूत करत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडनंतर भारताने नेपाळचा 100 हून अधिक धावांनी धुव्वा उडवला. सचिन धस आणि उदय सहारन यांच्या शतकी खेळीमुळे भारताने धावांचा डोंगर रचला होता. या खेळीच्या जोरावर भारताने नेपाळसमोर विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. नेपाळने सावध सुरुवात केली. पण त्यानंतर नेपाळचा डाव पत्त्यासारखा कोसळला. दीपक बोहरा आणि अर्जुन कुमाल बाद झाल्यानंतर रांगच लागली. एकेरी धावसंख्येवर एका पाठोपाठ एक खेळाडू तंबूत परतले. नेपाळला 50 षटकात 9 गडी गमवून फक्त 165 धावा करता आल्या. भारताने नेपाळचा 132 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आता ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाशी उपांत्य फेरीत सामना होणार आहे. भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.
दुसरीकडे, ग्रुप 1 मधून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठेल अशी स्थिती आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पाकिस्तान ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने असतील. भारत पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर मात्र अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.उपांत्य फेरीचा पहिला सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा सामना 8 फेब्रुवारीला होईल. तर अंतिम फेरीचा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
A fifth consecutive semi-final appearance for India in the Men's #U19WorldCup 😯#INDvNEP pic.twitter.com/vjAv7zZ15H
— ICC (@ICC) February 2, 2024
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला.
नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता