टीम इंडियाच्या खेळाडूसोबतच मोठा ‘गेम’, जवळच्या व्यक्तिकडून मोठी फसवणूक
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची फसवणूक झाली आहे. या खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीनेच त्याचा विश्वासघात केला आहे. नक्की प्रकरण काय जाणून घ्या.
नागपूर : टीम इंडियाचा स्टार खेळाडूसोबत मोठी घटना घडलीय. स्टार खेळाडूचा जवळच्या व्यक्तीने गेम केला आहे. ज्याच्यावर टीम इंडियाच्या खेळाडूने डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला. आपली प्रत्येक माहिती ज्याला सांगितली, त्यानेच दगा केला. टीम इंडियाच्या या खेळाडूची आर्थिक फसवणूक झाली आहे. खेळाडूच्या मॅनेजरनेच ही आर्थिक फसवणूक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला 44 लाख रुपयांचा चूना लागला आहे. क्रिकेटर म्हटलं की बिजी शेड्यूल. सराव, कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका या सुरुच असतात. अशात आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी उमेश यादवने शैलेश ठाकरे याची मॅनेजर म्हणून नेमणूक केली.
शैलेशला उमेशच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती होती. यात उमेशला क्रिकेट आणि इतर माध्यमातून मिळणारं उत्पन्न, बँक डिटेल्स आणि इतर माहितीचा समावेश होता. या माहितीचा उमेशच्या नकळत शैलेशने गैरफायदा घेतला.
नक्की प्रकरण काय?
हे प्रकरण मालमत्तेशी संबधित आहे. उमेशने प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी बँकेत 44 लाख रुपये जमा केले होते. मात्र झालं भलतंच. शैलशने उमेशच्या नकळत बँकेतील 44 लाख रुपये काढले. उमेशच्या पैशाने शैलेशने प्रॉपर्टी खरेदी केली. उमेशला सर्व प्रकार समजला. यानंतर उमेशने शैलेशकडे 44 लाख रुपयांची मागणी केली. मात्र पैसे परत मिळाले नाही. इतकंच नाही, तर शैलेश फरार झाला.
यानंतर उमेशने पोलिसांमध्ये धाव घेतली. उमेशने सांगितलेल्या हकीकतीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली. तसेच कोराडी पोलीस ठाण्यात शैलेश विरुद्ध आयपीसीच्या कलम 404 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच शैलेशने पगार घेऊन कोणतंही काम न केल्याचा आरोपही उमेशने केला. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरु आहे.
दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंडवर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. वनडे मालिकेनंतर उभयसंघात टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात उमेश यादव याचा समावेश करण्यात आला आहे.