टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक न्यूझीलंडच्या गोटात, कसोटी मालिकेपूर्वी स्पिन ट्रॅकबाबत देणार धडे
न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडने एक डाव टाकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भविष्यात न्यूझीलंडचा भारतावर भारी पडू शकतो.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात 9 सप्टेंबरला ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. सामना अफगाणिस्तानविरुद्ध असला तरी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण या सामन्यासाठी न्यूझीलंडने भारताचा माजी बॅटिंग कोच विक्रम राठोडकडे धुरा सोपवली आहे. आता विक्रम राठोड न्यूझीलंडच्या संघाला बॅटिंगचे धडे देणार आहे. तसेच श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज रंगना हेराथ फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत असणार आहे. न्यूझीलंडने विक्रम राठोडला फक्त अफगाणिस्तानविरुद्धच्या एका कसोटीसाठी बॅटिंग कोच म्हणून नियुक्त केलं आहे. पण त्यांची दूरदृष्टी काही वेगळीच असल्याचं दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंडचा संघही दावेदार आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून भारताविरूद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. 16 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. म्हणजेच एक महिन्यानंतर न्यूझीलंड आणि भारत आमनेसामने येतील. तत्पूर्वी अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना सराव ठरेल, तर फिरकी ट्रॅकची माहिती मिळेल.
भारताचा विक्रम राठोड आणि श्रीलंकेचा रंगना हेराथ यांच्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला स्पिन ट्रॅकबाबत धडे मिळणार आहेत. भारत आणि श्रीलंका या दोन्ही दौऱ्यात न्यूझीलंडला फायदा होऊ शकतो. अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळल्यानंतर न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार आहे. रंगना हेराथ यांना अफगाणिस्तान आणि श्रीलंका दौऱ्यासाठी नियुक्त केलं आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
Kia Ora India 👋
The Test squad arrived in Delhi on Thursday ahead of the one-off Test match against @ACBofficials in Noida which starts on Monday LIVE in NZ on @skysportnz #CricketNation pic.twitter.com/r59EYHg0lB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 5, 2024
विक्रम राठोड भारतासाठी 6 कसोटी सामने खेळला आहे. 2012 मध्ये टीम इंडियाच्या निवड समितीत होता. नॅशनल क्रिकेट अकादमीत राहुल द्रविड यांच्यासोबत कोचिंग स्टाफमध्ये होता. 2019 मध्ये बीसीसीआयने त्याच्या टीम इंडियाच्या बॅटिंग कोचची जबाबदारी सोपवली. राठोडने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रंगना हेराथ बांगलादेशचे स्पिन बॉलिंग कन्सलटेंट राहिले आहेत. हेराथने 93 कसोटी सामन्यात 433 विकेट घेतल्या आहेत. गॉल स्टेडियममध्ये त्यांच्या नावावर 100 विकेट आहेत. याच मैदानावर न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे.