वर्ल्ड कपचं स्वप्न अधुरं राहिल्यावर रोहितच्या डोळ्यातलं पाणी लक्षात, कांबळीचे अश्रू विसरलात? पाहा व्हीडिओ
Vinod Kambli Crying In World Cup 1996 : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र एक सामन्यासह वर्ल्ड कप गमावलेला. तेव्हा रोहित रडलेला. असंच विनोद कांबळीसोबत 1996 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेलं. जाणून घ्या काय झालेलं?
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक स्थितीसह आरोग्याशीही झगडतोय. कांबळीच्या आरोग्याचा मुद्दा महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकराच्या कार्यक्रमानिमित्ताने समोर आला. कांबळीला या या कार्यक्रमात त्याचा लहानपणीचा मित्र आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला इच्छा असतानाही मिठी मारता आली नाही. कांबळीला त्याच्या पायावरही निट उभं राहता आलं नव्हंत. इतकंच नाही, तर कांबळी आचरेकर सरांच्या आठवणीत गाणं गाताना अडखळत होता. या सर्व प्रकारानंतर कांबळी आणि त्याची तब्येत हे मुद्दे समोर आले. सचिन आणि कांबळी एकाच गुरुचे शिष्य. दोघांचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची सुरुवातही जवळपास सारखीच. डावखुरा कांबळी सचिनपेक्षाही भारी असल्याचं तेव्हा म्हटलं जायचं, यावरुन तो किती भारी खेळायचा याची कल्पना येऊ शकते.
कांबळी कसा खेळायचा, त्याची बॅटिंग 90 च्या दशतकातील क्रिकेट चाहत्यांनी पाहिलीय आणि अनुभवलीय. मात्र आताच्या पिढीला त्याबाबत फक्त ऐकून किंवा वाचून माहितीय. फार फार व्हीडिओतून कांबळी कसा खेळला हे आता समजू शकतं. कांबळीने आपल्या बॅटिंगने धमाका केला होता. कांबळीने त्याचा काळ गाजवला होता. आपण या निमित्ताने कांबळीचा एक किस्सा जाणून घेऊयात.कांबळी सामन्यादरम्यान भावूक झाला होता.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. तेव्हा कॅप्टन रोहितला अश्रू अनावर झाले होते. तेव्हा टीम इंडियासह सारा भारत रडला होता. रोहितप्रमाणे विनोद कांबळीही अशाच प्रकारे भावूक झाला होता. कांबळी भर मैदानात रडू लागला होता. तेव्हाही वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होता.
काय झालं होतं?
भारतात 1996 साली वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. विनोद कांबळी वर्ल्ड कप संघात होता. टीम इंडियाने मोहम्मद अझहरुद्दीन याच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत धडक मारली. टीम इंडिया आता वर्ल्ड कप उंचावण्यापासून 2 विजय दूर होती. मात्र उपांत्य फेरीतील सामन्यात असं काही झालं ज्याचा विचार कुणीच केला नसेल.
कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान होतं. श्रीलंकेने 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाचे फलंदाज धावांचा पाठलाग करताना ढेर झाले. टीम इंडियाने 34 ओव्हरमध्ये 120 धावांवर 8 विकेट्स गमावले होते. त्यामुळे क्रिकेट चाहते संतापले. उपस्थित क्रिकेट चाहत्यांपैकी काही जणांनी स्टेडियममध्ये एका भागात आग लावली. एकच गोंधळ झाला. बॉल बॉयना दुखापत झाली. चाहत्यांना वाढता उद्रेक पाहून मॅच रेफरी क्लाईव लॉयड यांनी पंचांशी चर्चा करुन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कांबळीला अश्रू अनावर
मैदानात हा सर्व प्रकार घडला तेव्हा कांबळी 10 धावांपर्यंत पोहचला होता. सामना निश्चित टीम इंडियाच्या हातातून गेला होता. मात्र कांबळीने जिद्द सोडली नव्हती. टीम इंडियाला विजयी करायचं अशी खूनगाठच कांबळीने बांधली होती. मात्र सामना रद्द करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं. कांबळीला हे फार जिव्हारी लागलं. कांबळी मैदानातून बाहेर जाताना रडत होता. कांबळीचं हे रडणं आजही अनेकांच्या चांगलंच लक्षात आहे. कोणताही कट्टर क्रिकेट चाहता हे क्षण आणि कांबळीला कधीही विसरणार नाहीत.
विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कांबळी आणि सचिन या दोघांनी मुंबईसाठी शालेय स्तरावरील स्पर्धेत 664 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. तेव्हापासून कांबळी आणि सचिनची चर्चा होऊ लागली जी आजही आहे. त्यानंतर कांबळीने 1991 साली एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर 2 वर्षांनंतर 1993 साली कसोटी पदार्पण केलं.
कांबळीने 17 कसोटी सामन्यांमधील 21 डावांत 54.2 च्या सरासरीने 1 हजार 84 धावा केल्या. कांबळीने या दरम्यान 4 शतकं, 2 द्विशतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. तर कांबळीने 104 एकदिवसीय सामन्यांमधील 97 डावांत 2 हजार 477 धावा केल्या. कांबळीने वनडेमध्ये 2 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली होती.