मुंबई : भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह याने एका टॉक शोमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र धोनीसोबत आपली जवळचा मित्र नसल्याचं युवीने म्हटलं आहे. भारताने जिंकलेले टी-20 आणि वन डे वर्ल्ड कप या दोन्हींमध्ये युवराज आणि धोनीने महत्त्वाची भूमिक बजावली होती. युवराज असं का म्हणाला? यावेळी त्याने दोन उदाहरणंही दिलीत. त्यासोबतच करिअरच्या शेवटला धोनीने त्याला काय सांगितलं याबाबतही युवराजने खुलासा केलाय.
मी आणि माही जवळचे मित्र नाहीत, आम्ही एकत्र खेळत होतो त्यामुळे आमची मैत्री होती. पण आमच्यात कधी घट्ट मैत्री झाली नाही. प्रत्येकाची जीवन जगण्याची वेगळी पद्धत असते. संघातील 11 खेळाडू कधी एकत्र राहत नाहीत. मी आणि माही मैदानात उतरायचो त्यावेळी आम्ही 100 टक्के द्यायचो. धोनी कर्णधार आणि मी उपकर्णधार असताना त्याचे अनेक निर्यण मला पटायचे नाहीत, तर माझेही काही निर्णय त्याला समजण्यापलीकडे असायचे, प्रत्येक संघात असं असतंच, असं युवराज सिंहने सांगितलं.
अनेकदा धोनी मैदानात असताना जखमी किंवा दुखापती झाला की मी त्याचा रनर बनून मैदानात उतरायचो. मला आठवतंय की धोनी 90 धावांवर असताना त्याला 100 पर्यंत पोहोचण्यासाठी मी त्याला स्ट्राईक दिलेली. त्यावेळी मला दोन धावा पूर्ण करताना डाय मारावी लागली होती. धोनीनेही 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलंँडविरूद्ध 48 धावांवर असताना अर्धशतक पूर्ण करताना मदत केल्याचं युवराजने सांगितलं.
माझ्या करीअरच्या शेवटाला आलो होतो तेव्हा भविष्याबद्दल काही माहित नव्हतं. तेव्हा मी धोनीला एक सल्ला मागितला होता, त्यावेळी मला धोनीने सांगितलं होतं की निवड समिती माझ्याबद्दल विचार करत नाही. त्यामुळे मला काय चालू आहे हे लक्षात आलं होतं. ही 2019 वर्ल्ड कपच्याआधीची गोष्ट असल्याचं युवराज म्हणाला.
दरम्यान, आता आम्ही दोघेही रिटायर झालो असून जेव्हा भेटतो तेव्हा चांगले मित्र म्हणून भेटतो. आताच एका जाहिरातीच्या शूटमध्ये एकत्र भेटलो होतो त्यावेळी खूप मजा केली आणि गप्पा मारल्याचं युवराजे सांगितलं.