Champions Trophy : यशस्वी जयस्वाल याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर का केलं? गौतम गंभीरचं उत्तर, म्हणाला…
Gautam Gambhir On Yashasvi Jaiswal : Gautam Gambhir On Yashasvi Jaiswal : बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात 2 बदल केल्याचं जाहीर केलं. त्यानुसार दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह याच्या जागी हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला. तर यशस्वी जयस्वाल याला वगळून वरुण चक्रवर्ती याला संधी देण्यात आली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या थराराला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाचे एकूण 5 खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाले. तिघांना दुखापतीने घेरलं. एकाने निवृत्ती घेतली. तर दुसऱ्याने वैयक्तिक कारणाचा दाखला घेत खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दोघांना दुखापतीमुळे खेळता येणार नाही. अफगाणिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघाचे 1-1 खेळाडूही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाल्याचं बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला जाहीर केलं. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात एकूण 2 बदल केले.
निवड समितीने जसप्रीत बुमराहऐवजी हर्षित राणा याचा समावेश केला. तर दुसरा निर्णय हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनपेक्षित होता. निवड समितीने युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला मुख्य संघातून बाहेर केलं. यशस्वीच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश करण्यात आला. फलंदाजाच्या जागी स्पिनर कसा काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. तसेच यशस्वीला का काढलं? असा प्रश्नही क्रिकेट चाहत्यांना पडला. भारताचा हेड कोच गौतम गंभीरने याने या प्रश्नाचं उत्तर दिलं.
यशस्वी जयस्वालला का काढलं?
गंभीरने यशस्वीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघातून बाहेर करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. याचं एकमेव कारण असं आहे ती आम्हाला विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या रुपात एक पर्याय पाहिजे होता. सर्वांना माहित आहे की वरुण चक्रवर्ती पर्याय असू शकतो. यशस्वीला फार भविष्य आहे आणि आम्ही फक्त 15 खेळाडूंचीच निवड करु शकतो”, असं गंभीरने म्हटलं.
टीम इंडियाकडून इंग्लंडला क्लिन स्वीप
दरम्यान टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी धमाका केलाय. टीम इंडियाने मायदेशात इंग्लंडवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप केलाय. भारताने 3-0 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.