टीम इंडियाचा ओपनर यशस्वीचा मोठा निर्णय, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज
Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय घेतला आहे. यशस्वीने ठरवलंय तसं झालं तर तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळताना दिसू शकतो.
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा हा सलामीवीर फलंदाज रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई रणजी ट्रॉफी 23 जानेवारी जम्मू-काश्मीर विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यातील निवडसाठी यशस्वी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यशस्वी जयस्वाल याने आपण उपलब्ध असल्याचं मुंबईचे क्रिकेट टीमचे कोच ओमकार साळवी यांना कळवलं आहे. यशस्वीने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उल्लेखनीय कामिगिरी केली होती.
यशस्वीने मुंबईचे कोच ओमकार साळवी यांना आपण उपलब्ध असल्याचं सांगितलंय. निवड समिती येत्या काही दिवसांमध्ये मुंबई संघाची निवड करेल,असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने एमसीए अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे.
हिटमॅनचा जोरदार सराव
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी 14 जानेवारी रोजी मुंबई टीमसह सराव सत्रात सहभाग घेतला. रोहितने मुंबई टीमसह बॅटिंगचा सराव केला. रोहितने या दरम्यान अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर याच्यासह सराव केला. रोहित आणि यशस्वीची दुसऱ्या टप्प्यांमधील सामन्यांसाठी झाली, तर मुंबईची ताकद दुप्पट होईल.
यशस्वी जयस्वाल मुंबई टीममध्ये कमबॅकसाठी सज्ज
– Rohit Sharma training with Mumbai Ranji team.
– Yashasvi Jaiswal has informed his availability for next round match in Ranji. [Express Sports]
– Shubman Gill has informed his availability for next round match in Ranji. [Espn Cricinfo] pic.twitter.com/XyMSXqpfmm
— Johns. (@CricCrazyJohns) January 14, 2025
इंग्लंडविरुद्ध संधी नाही!
दरम्यान टीम इंडिया 22 जानेवारीपासून मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघात या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी 12 जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र या टी 20i मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल याला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता यशस्वीची इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.