नवी दिल्ली : बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी 5 वाजून एक मिनिट 13 सेकंदांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. टीम इंडियाचा प्रत्येक चाहता या व्हिडिओची वाट पाहत होता. हा व्हिडिओ पाहून आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने फॅन्समध्ये एक नवीन अशा निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ आहे, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा. यात तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. बुमराहच पुनरागमन ही निश्चित आनंदाची बाब आहे. पण यामुळे एक प्रश्न निर्माण झालाय. जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ आयर्लंडमधील आहे. तिथे तो टी 20 सीरीजमध्ये खेळणार आहे.
मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर पाठिच्या दुखण्यामध्ये तो क्रिकेटपासून लांब होता. न्यूझीलंडमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर फिटनेस सिद्ध करुन तो आता टीम इंडियात दाखल झालाय.
खरी चिंता कुठली?
बुमराह आयर्लंड विरुद्धच्या सीरीजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो टीम इंडियाचा कॅप्टन आहे. टीम इंडियासाठी आयर्लंड विरुद्धची सीरीज महत्त्वाची आहे. जसप्रीत बुमराहच पुनरागमन ही निश्चित चांगली बाब आहे. आशिया कप आधी आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमुळे त्याला स्वत:च्या फिटनेसची चाचपणी करण्याची आणि लय मिळवण्याची संधी मिळेल. खरी चिंता वर्कलोडची आहे.
बुमराहला तो स्टॅमिना, रिदम मिळवता येईल का?
आयर्लंड विरुद्ध बुमराह टी 20 सीरीज खेळणार आहे. तीन मॅचच्या या सीरीजमध्ये त्याला जास्तीत जास्त 12 ओव्हर टाकायला मिळतील. मॅचच्या स्थितीनुसार, त्यात काही कमी-जास्त सुद्धा होईल. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजनंतर 10 दिवसांनी जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार आहे. हा कप यंदा वनडे फॉर्मेटमध्ये आहे. या सामन्यात 10 ओव्हर आणि एक स्पेल 4-5 ओव्हरचा असेल. बुमराहसाठी फिटनेसच्या दुष्टीने हे आव्हानात्मक असेल. 6 दिवसात 12 ओव्हर गोलंदाजी करुन 4 तासात 10 ओव्हरची गोलंदाजी करण्याचा स्टॅमिना, रिदम मिळवता येईल का? हा प्रश्न आहे.
आयर्लंड आणि श्रीलंकेतील परिस्थिती, हवामान यामध्ये फरक आहे. मॅलहाइडमध्ये तीन मॅचची सीरीज होणार आहे. तिथे अधिकतम तापमान 20 से 22 डिग्री सेल्सियस असतं. श्रीलंकेच्या कँडीमध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार आहे. तिथे न्यूनतम तापमान 23 डिग्री आहे.