Icc Champions Trophy साठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? पाहा संभाव्य संघ
Team India Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.त्यामुळे आता संघात कुणाला संधी मिळणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान या स्पर्धेतील एकूण 8 संघांमध्ये 15 सामने पार पडणार आहेत. एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार ए ग्रुपमध्ये गतविजेता आणि यजमान पाकिस्तान, टीम इंडिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण 8 पैकी फक्त एका संघानेच टीम जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारी संघ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे 12 जानेवारीपर्यंत किंवा 12 जानेवारीला भारतीय संघ जाहीर होणार हे निश्चित आहे. अशात आता भारतीय संघात कुणाला संधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. या निमित्ताने आपण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ कसा असू शकतो? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद असल्याने टीम इंडियाचे साखळी फेरीतील सर्व सामने हे दुबईत होणार आहे. टीम इंडिया इतर संघांप्रमाणे साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध करणार आहे. दुसऱ्या सामन्यात रोहितसेना पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे तर तिसरा आणि अंतिम सामना हा न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तसेच टीम इंडिया उपांत्य आणि अंतिम फेरीत पोहचल्यास दोन्ही सामनेही दुबईतच होतील.
टीम इंडियाचं वेळापत्रक
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल 1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल 2, 5 मार्च, लाहोर
अंतिम सामना, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)
आयीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.