AUS vs IND : टीम इंडियाच्या पराभवासह 2 वर्षांची मेहनत वाया, रोहितसेनेला सर्वात मोठा झटका
Indian Cricket Team : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभव झाला. टीम इंडियाला या मालिका पराभवासह सर्वात मोठा झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर सिडनीत झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा उडवला. कांगारुंनी यासह 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेलं 162 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. टीम इंडियाची या पराभवासह गेल्या 2 वर्षांची मेहनत वाया गेली आहे. रोहितसेनेला यासह मोठा झटका लागला आहे. नक्की काय झालंय? सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया या पाचव्या सामन्यातील पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक होतं. या विजयावर पुढील सर्व समीकरणं अवलंबून होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला. टीम इंडियाची यासह डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रिक हुकली. टीम इंडियाने याआधी दोन्ही साखळ्यांमध्ये सलग अंतिम फेरीत धडक मारली होती. टीम इंडियाच्या पराभवामुळे गेल्या 2 वर्षांची मेहनत वाया गेली.
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीत एकूण 6 मालिका खेळल्या. टीम इंडियाने या 6 पैकी 3 मालिका जिंकल्या. 1 मालिका बरोबरीत सोडवली. तर 2 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने या साखळीतील पहिल्याच मालिकेत विंडीज दौऱ्यात 1-0 ने विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर इंग्लंड आणि बांगलादेशचा मायदेशातील मालिकेत धुव्वा उडवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 4-1 तर बांगलादेशवर 2-0 ने मात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख घसरला. टीम इंडियाला सलग आणि शेवटच्या 2 मालिका गमवाव्या लागल्या. न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडियाला 3-0 ने व्हाईटवॉश केलं. तर आता 10 वर्षांनंतर टीम इंडियावर बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावण्याची वेळ ओढावली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.