Team India : रोहित आणि विराटची गेल्या Icc Champions Trophy स्पर्धेतील कामगिरी कशी होती?
Rohit Sharma and Virat Kohli Icc Champions Trophy : टीम इंडियाला गेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्या स्पर्धेत टीम इंडियाच्या एका फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या होत्या.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान ह पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. मात्र रोहित शर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. रोहित शर्माची या स्पर्धेत नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेच विराट कोहली याने गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. या अनुभवी आजी माजी कर्णधारांकडून यंदाच्या या स्पर्धेत मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या दोघांनी गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत किती धावा केल्या होत्या? हे जाणून घेऊयात.
विराट कोहली याने गेल्या वेळेस 2017 मध्ये झालेल्या चॅम्पिन्स ट्रॉफीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. टीम इंडियाला तेव्हा अंतिम सामन्यात पाकिस्तानने पराभूत केलं होतं. मात्र या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही तेव्हा उल्लेखनीय कामगिरी केली होती. रोहितेने तेव्हा विराटपेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
हिटमॅनच्या विराटपेक्षा अधिक धावा
रोहितने तेव्हा 5 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 304 धावा केल्या होत्या. रोहितने नाबाद शतक केलं होतं. रोहितची 123 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या होती. तर विराट कोहली याने 5 सामन्यांमध्ये 258 धावा केल्या होत्या. विराटने तेव्हा 3 अर्धशतकं केली होती. तर विराट शतकापासून अवघ्या 4 धावांनी दूर राहिला होता. विराट 96 धावांवर नाबाद परतला होता. त्यामुळे यंदाही या अनुभवी जोडीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
शिखर धवनच्या सर्वाधिक धावा
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेत टीम इंडियाच्या शिखर धवन याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. धवनने 5 सामन्यांमध्ये 338 धावा केल्या होत्या. धवनने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली होती.
दरम्यान टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे.
रोहितसेनेचं वेळापत्रक
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल 1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल 2, 5 मार्च, लाहोर
अंतिम सामना, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)