मुंबई : येत्या आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला पार पडणार आहे. या लिलावामध्ये तब्बल 1166 खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. मात्र आता ते संघाबाहेर असल्याने त्यांच्यावर कोण बोली लावत की नाही काही सांगता येत नाही. यामधील काही खेळाडूंनी आपली बेस प्राईज ही त्यांची कामगिरी पाहता काहीच्या काही ठेवली आहे.
यंदाच्या लिलावामध्ये 830 भारतीय खेळाडू आहेत यामध्ये 18 खेळाडू असे आहेत जे भारतासाठी खेळले आहेत. हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांनी आपली बेस प्राईज ही 2 कोटी ठेवली आहे. तर वरुण आरोन, केएस भरत, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर सरन, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी आणि संदीप वारियर यांनी आपली बेस प्राईज ही 50 लाख ठेवली आहेत. यामध्ये असे तीन खेळाडू आहेत ज्यांना यंदाच्या लिलावामध्ये बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
केदार जाधव याने लिलावामध्ये आपली बेस प्राईज ही 2 कोटी ठेवली आहे. केदार जाधव देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजुनही खेळत आहे मात्र तो आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला नाही. फ्रँचायझी त्याच्यासाठी दोन कोटी खर्च करण्याची शक्यता खूप कमी आहे. आयपीएलमध्ये केदारने 95 सामन्यामध्ये 1208 धावा केल्या आहेत.
या यादीमध्ये दुसरा खेळाडू हनुमा विहारी असून त्याला आयपीएलमध्ये फार काही चमकदार कामगिरी करता आली नाही. विहारीने 2013 IPL मध्ये पदार्पण केलं होतं, अवघे 24 सामने खेळला असून त्यातील 13 सामने पहिल्याच मोसमात खेळायला मिळाले होते. यानंतर 2015 मध्ये तो फक्त 5 आणि 2019 मध्ये 2 सामने खेळू शकला. 2019 पासून तो एकही आयपीएल खेळला नाही. त्यामुळे यंदाच्य लिलावामध्ये त्याला बोली लावण्यासाठी फ्रँचायझी जास्त रस घेणार नाहीत.
तिसरा खेळाडू वरुण अॅरोन असून टीम इंडियाकडून तो वन डे आणि कसोटीमध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये वरूणला काही खास कामगिरी करता आली नाही. कारण 50 पेक्षा जास्त सामने खेळूनही त्याने अवघ्या 44 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमीच आहे.