Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडिया किती सामने खेळणार?
Champions Trophy 2025 Team India: रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता रोहितसेनेा मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. मात्र भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावासाठी किती सामने आहेत? जाणून घ्या
टीम इंडियासाठी श्रीलंका दौरा संमिश्र स्वरुपाचा राहिला. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20I मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला. तर त्यानंतर श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत इतिहास रचला. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली. श्रीलंकेची टीम इंडिया विरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकण्याची 27 वर्षांची प्रतिक्षा संपवली. उभयसंघातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. तर त्यानंतर श्रीलंकेने उर्वरित 2 सामने जिंकले. अशाप्रकारे टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता झाली. या मालिकेसह टीम इंडिया 2024 वर्षातील अखेरची एकदिवसीय मालिका खेळली. भारताला या वर्षात फक्त 3 एकदिवसीय सामनेच खेळण्याची संधी मिळाली.
त्यानंतर आता टीम इंडिया बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, साउथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी/टी20I मालिका खेळणार आहे. मात्र साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आहे. टीम इंडियाचा आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. मात्र टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सरावासाठी फार कमी सामन्यांचीच संधी आहे.
चॅम्पिन्स ट्रॉफी
चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. टीम इंडियाला या स्पर्धेआधी सरावासाठी फक्त 3 एकदवसीय सामन्यांचीच संधी आहे. टीम इंडिया 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही दिवसआधीच होणार आहे. इंग्लंड क्रिकेट टीम जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20I आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
भारतासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी आधी आव्हान
दरम्यान टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत निष्प्रभ ठरली. कॅप्टन रोहित शर्मा याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच भारतीय फलंदाज स्पिनसमोर अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर या चुका सुधारण्याचं आव्हान असणार आहे.