भारताचा भन्नाट गोलंदाज, ज्याची अॅक्शन वर्ल्डकपचा लोगो बनला, ज्याने अन्वरला नाचवलं, जो 25 व्या वर्षीच संघाबाहेर गेला!
ओदिशासारख्या छोट्या राज्यातून येऊन, टीम इंडियात स्थान मिळवणं, बोलिंगमध्ये दबदबा निर्माण करणं, इतकंच नाही तर विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणं हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी अभिमानाची बाब असते.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघात स्थान (Team India) मिळवण्यामध्ये मुंबई, दिल्ली, कर्नाटक यासारख्या बड्या राज्यातील खेळाडूंची चलती होती. मात्र ओदिशासारख्या छोट्या राज्यातून येऊन, टीम इंडियात स्थान मिळवणं, बोलिंगमध्ये दबदबा निर्माण करणं, इतकंच नाही तर विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणं हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी अभिमानाची बाब असते. ओदिशातून आलेल्या या खेळाडूने भारताकडून जवळपास 50 सामने खेळले. इतकंच नाही तर विश्वचषकात जवागल श्रीनाथनंतर (Jawagal Srinath) सर्वाधिक विकेट्स घेतल्या. याच खेळाडूने पाकिस्तानचा धडाकेबाज खेळाडू सईद अन्वरसारख्या (Pakistan Saeed Anwar) खेळाडूला त्रस्त केलं. हा खेळाडू म्हणजे भारताचा मध्यमगती गोलंदाज देबाशीष मोहंती (Debasis Mohanty) होय. (Team Indias retired bowler Debasis Mohanty journey world cup 1999 memories)
देबाशीष मोहंतीचा जन्म 20 जुलै 1976 रोजी भुवनेश्वरमध्ये झाला. स्थानिक क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याला सर्वात आधी कसोटी संघात स्थान मिळालं. 1997 मध्ये मोहंती टीम इंडियाकडून श्रीलंकेविरुद्ध मैदानात उथरला. पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट घेऊन, त्याने झोकात एण्ट्री केली. मात्र दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही.
शेवटचा कसोटी सामना
त्यानंतर तीन महिन्यांनी भारतात झालेल्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली. हा सामनाही श्रीलंकेविरुद्ध होता. मात्र तो सामना त्याचा अखेरचा ठरला. मोहालीमध्ये झालेल्या या सामन्यात मोहंतीला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे तो कसोटी संघातून बाहेर पडला.
स्विंग मास्टर
देबाशीष मोहंती हा स्विंग मास्टर होता. इनस्विंग आणि आऊटस्विंग दोन्ही करण्यात तो माहीर होता. त्यामुळे तो जरी कसोटी संघात जास्त काळ टिकू शकला नसला, तरी वन डेमध्ये त्याने दबदबा निर्माण केला होता.
सईद अन्वर परेशान
मोहंतीने 1997 मध्येच सहारा चषकातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या मालिकेत त्याने 6 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 3 विकेट घेऊन, भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. महत्त्वाचं म्हणजे 6 सामन्यांपैकी तीन सामन्यात मोहंतीने पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर सईद अन्वरला बाद केलं होतं.
सईद अन्वरला देबाशीष मोहंतीची गोलंदाजीच समजत नव्हती. त्याने सचिन तेंडुलकरला त्याबाबत बोलून दाखवलं होतं. मोहंती नेमका कसा गोलंदाजी करतो, त्याची अॅक्शन नेमकी कशी हे कळत नाही, असं अन्वर तेंडुलकरला म्हणाला होता.
बोलिंग अॅक्शन बनवा वर्ल्ड कप लोगो
देबाशीष मोहंती आपला शेवटचा वन डे सामना 2001 मध्ये खेळला. त्याने एकूण 45 वन डे सामन्यात 57 विकेट्स घेतल्या. 4 बाद 56 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मोहंती ज्यावेळी संघाबाहेर गेला, त्यावेळी त्याचं वय 25 वर्ष होतं. त्याची गोलंदाजी अॅक्शन वेगळीच होती. त्यामुळेच कदाचित 1999 च्या वर्ल्डकपचा लोगो, त्याच्या अॅक्शनवरुन बनवण्यात आला.
(Team Indias retired bowler Debasis Mohanty journey world cup 1999 memories)