इंग्लंडच्या हंड्रेड लीगमध्ये खेळणार आयपीएल टीम! ईसीबीने आखलेला नवा प्लान आला समोर
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. त्यामुळे या स्पर्धेची आणि संघांची भूरळ जगभरातील क्रीडारसिकांना आहे. आता ईसीबीने द हंड्रेडसाठी एक खास प्लान आखला आहे. त्यामुळे आयपीएल संघांचा बोलबाला या स्पर्धेत दिसेल.
इंग्लंडमध्ये हंड्रेड लीग स्पर्धेने गेल्या काही वर्षात नावलौकिक मिळवला आहे. 100 चेंडूच्या या सामन्यात जगभरातील दिग्गज खेळाडू खेळतात. पण अजूनही हवं तसं मार्केट मिळालेलं नाही. त्यामुळे इंग्लंड अँड वेल्स बोर्डाने द हंड्रेड लीगसाठी एक खास प्लान आखला आहे. आता द हंड्रेड लीगमध्ये आयपीएल संघांची नाव पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्यासाठी ईसीबीने प्लान आखला आहे. आयपीएल संघांनी द हंड्रेड स्पर्धातील संघांचे शेअर विकत घेतले की ते त्या संघाचं नावं बदलू शकतात. दक्षिण अफ्रिका लीगसह इतर लीगमध्ये असं दिसून आलं आहे. SA20 लीगमध्ये राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी पर्ल रॉयल्स या नावाने खेळते. इतर लगीमध्येही आयपीएल संघांच्या नावाचं असंच चित्र पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर हंड्रेड लीगमध्ये संघांची नाव दिली जातील असं सांगितलं जात आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून याला लवकरच हिरवा कंदील मिळेल.
द हंड्रेड या स्पर्धेत आता 8 संघ खेळतात. त्यामुळे आयपीएलमधील दहाही संघांनी शेअर खरेदी करावेत, असा प्रयत्न आहे. या लिलावासाठी आयपीएलमधील सर्व संघ तयार असल्याची चर्चा आहे. पण यासाठी काही नियम आणि अटी असावेत, अशी वेगळी मागणी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचं लक्ष भारतीय मार्केटवर आहे. इंग्लंड बोर्डाला भारतीय भांडवल द हंड्रेड स्पर्धेत आणायचं आहे. ईसीबी पुढच्या महिन्यात आठ संघांचे 49 टक्के शेअर विकण्याची प्रक्रिया सुरु करेल. या माध्यमातून 4342 कोटी रुपये कमवण्याचा मानस आहे.
मुंबई इंडियन्सचे जगभरातील लीगमध्ये एकूण चार संघ आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त एमएलसी लीगमध्ये एमआय न्यूयॉर्क, आयएलटी 20 लीगमध्ये एमआय एमीरेट्स आणि एसए 20 लीगममध्ये एमआय केपटाउन हे संघ आहेत. जर द हंड्रेडमध्ये गुंतवणूक केली तर पाचवा संघ होईल. मुंबई इंडियन्स द हंड्रेड स्पर्धेतील लंडन स्पिरिट या संघात पैसे गुंतवू शकते, असा मीडिया रिपोर्ट आहे. जर असं झालं तर या संघाचं नाव एमआय लंडन होऊ शकतं.