IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला गाशा गुंडाळावा लागला आहे. यंदा मुंबई इंडियन्सची स्थिती निराशाजनक राहिली आहे. संघात स्टार खेळाडूंचा भरणा असूनही गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहावं लागलं आहे. अशात आतापासूनच पुढच्या पर्वाची चर्चा रंगली आहे. तसेच मेगा लिलावात कोणते प्लेयर्स रिलीज करणार याचीही खलबतं सोशल मीडियावर सुरु आहेत.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स एक यशस्वी फ्रेंचायसी गणली जाते. मात्र तीन पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 2022 आणि 2023 मध्ये, तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 2024 मध्ये मुंबईच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघात उलथापालथ होईल अशी दाट शक्यता आहे. त्यात मेगा लिलावापूर्वी किती खेळाडू रिटेन करता येतील हा देखील प्रश्न आहे. आयपीएल नियमानुसार चार खेळाडूंना रिटेन करता येऊ शकतं. काही दिवसांपूर्वी फ्रेंचायसीने बीसीसीआयकडे 8 खेळाडू रिटेन करण्यासाठी विनवणी केली होती. मात्र बीसीसीआयने या नियमात काही बदल केलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करेल याची चर्चा रंगली आहे. असं असताना प्रत्येक जण आपलं वेगवेगळं मत मांडत आहे. पण बहुतांश जणांची पसंती या चार नावांना मिळालेली दिसत आहे. यात माजी कर्णधार रोहित शर्मा, सध्याच्या कर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाची चर्चा आहे.
रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून घेतलं. पण रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं एक वेगळं नातं आहे. धोनी म्हंटलं की चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहली म्हंटलं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ समोर येतो. तसेच रोहित शर्मा म्हंटलं की मुंबई इंडियन्स डोळ्यासमोर येते. त्यामुळे फ्रेंचायसी रोहित शर्माला सहजासहजी सोडणार नाही. उलट त्याला रिटेन करेल असंच दिसत आहे. रोहित शर्मा एका पर्वासाठी 16 कोटी रुपये फी घेतो.
मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला घेतलं आहे. तसेच त्याच्यावर विश्वास टाकत कर्णधारपद सोपवलं. त्यामुळे त्याला फ्रेंचायसी काही सोडणार नाही. उलट पुढच्या पर्वातही तोच नेतृत्व करताना दिसेल. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला जेतेपद आणि एकदा अंतिम फेरीत पोहोचवलं आहे. हार्दिक पांड्याल आयपीएल पर्वासाठी 15 कोटी रुपये मिळतात.
जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. जागतिक पातळीवर त्याचा नावलौकीक आहे. बुमराहने आयपीएलच्या 133 सामन्यात 165 विकेट्स घेतल्या आहेत. तसे सध्या 13 सामन्यात विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे. त्याला रिलीज करणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. बुमराहला एका आयपीएल पर्वासाठी 12 कोटी रुपये मिळतात.
सूर्यकुमार यादव हा कधीही सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. तो मैदानात असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघांना धाकधूक असते. त्याला फिल्डिंग कुठे लावावी आणि कुठे चेंडू टाकावा हा प्रश्न असतो. त्यामुळे तो आऊट होईपर्यंत जीवात जीव नसतो. अशावेळी त्याला सोडणं कठीण आहे. सूर्यकुमार यादवला एका आयपीएल सीझनसाठी 8 कोटी रुपये मिळतात.