टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हे चार संघ पोहोचतील, युवराज सिंगने वर्तवलं भाकीत
टी20 वर्ल्डकप स्पर्धा जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघ स्पर्धेत आहेत. साखळी फेरीत पाच-पाच संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. त्यातून सुपर 8 मध्ये संघांची निवड होईल. आता उपांत्य फेरीत कोणते संघ असतील याबाबत युवराज सिंगने आधीच भाकीत केलं आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी 20 संघांनी जय्यत तयारी केली आहे. काही लिंबूटिंबू संघ सोडले तर दिग्गज संघ या स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. ही स्पर्धा 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडणार आहे. तर 29 जूनला अंतिम फेरीचा सामना असणार आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, ओमान, पापुआ न्यू गिनी, पाकिस्तान, स्कॉटलँड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, युगांडा, अमेरिका, वेस्ट इंडिज या 20 संघांचा समावेश आहे. या 20 संघांची पाच पाच गटात दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. भारत अ गटात असून पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ आहेत. प्रत्येक गटातून दोन संघांची सुपर आठमध्ये वर्णी लागेल. त्यातील टॉप संघांची निवड उपांत्य फेरीसाठी होईल. साखळी फेरीचे सामने 1 जून ते 18 जून दरम्यान होतील. त्यानंतर सुपर 8 फेरीचे सामने 19 जून ते 25 जून दरम्यान होतील. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जूनला होतील. तर 29 जूनला अंतिम फेरीचा सामना होईल. असं सर्व गणित असताना सिक्सर किंग आणि भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या युवराज सिंगने उपांत्य फेरीतील 4 संघांची नावं जाहीर केली आहेत.
उपांत्य फेरीसाठी युवराज सिंगने भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडला पसंती दिली आहे. गेल्या टी20 विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती. यंदाच्या विश्वचषकातही टीम इंडिया तिथपर्यंत मजल मारेल. इतकंच काय तर युवराज सिंगने जेतेपदासाठी भारतीय संघाला पसंती दिली आहे. गतविजेता इंग्लंड यावेळीही उपांत्य फेरीत खेळणार आहे. उत्कृष्ट संघ असलेल्या जोस बटलरच्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते, असं युवराज सिंगला वाटते.पाकिस्तान संघ देखील उपांत्य फेरीत प्रवेश करेल. क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल अशी युवराज सिंगला अपेक्षा आहे. 2021 टी20 वर्ल्डकप चॅम्पियन ठरलेला ऑस्ट्रेलिया संघालाही उपांत्य फेरीसाठी युवराज सिंगने पसंती दिली आहे.
युवराज सिंगने पसंती दिलेल्या चार संघांची कामगिरी कशी ठरते याकडे लक्ष लागून असेल. युवराज सिंगचं भाकीत खरं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप खेळत आहे. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताने 10 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे यंदा टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. साखळी फेरीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र बाद फेरीत वारंवार येणाऱ्या अपयशामुळे क्रीडाप्रेमींना जरा जास्तच काळजी वाटत आहे.