वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने विजय मिळवला तरच पुढचा मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्देत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे लागून होतं. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विचार अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती करणार आहे. खरं तर दुलीप ट्रॉफी स्पर्धा मुशीर खान, मानव सुथार आणि आकाश दीपने गाजवली. पण त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी पाहता निवड होणं कठीण आहे. कारण बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत जोखिम घेणं टीम इंडियाला परवडणारं नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात चांगली फलंदाजी आणि अनुभव असलेल्या खेळाडूंचा विचार होईल. यात केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि सरफराज खान यांचा समावेश आहे. कारण या खेळाडूंनी प्रभावी म्हणता येणार नाही पण साजेशी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, शुबमन गिलने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही. तर त्याची टीम इंडियात निवड होऊ शकते.
इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पहिल्या डावात साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याला फक्त 9 धावा करता आल्या. पण दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. दुसरीकडे याच सामन्यात अक्षर पटेलने लक्ष वेधून घेतलं. त्याने पहिल्या डावात 86 धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या आणि 1 गडी बाद केला.
दुलीप ट्रॉफीत इंडिया बी संघाकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या डावात 9 धावा केल्या आणि बाद झाला. पण दुसऱ्या डावात 36 चेंडूत 46 धावा केल्या. दुसरीकडे, विकेटकीपर बॅट्समन म्हणून शर्यत तगडी आहे. पहिल्या डावात फेल ठरलेला ऋषभ पंत दुसऱ्या डावात चमकला. त्याने दुसऱ्या डावात 47 चेंडूत 61 धावा केल्या. केएल राहुलने पहिल्या डावात 111 चेंडूत खेळत 37 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 121 चेंडूंचा सामना करत 57 धावा केल्या. ध्रुव जुरेलने चांगली विकेटकिपींग केली पण धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याचा नावाचा विचार होणं कठीण आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, अक्षऱ पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/आकाश दीप, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान