“कुठे आहे जसप्रीत बुमराह?”, आयपीएल विनिंग कोचने कर्णधार हार्दिक पांड्याला झापलं
आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्ससोबत बरं काही घडताना दिसत नाही. गुजरात टायटन्स विरुद्धचा हातात असलेला सामना गमावला. तर हैदराबादने तर मुंबईच्या गोलंदाजीची पिसं काढली. असं असताना आयपीएल विनिंग कोचने हार्दिक पांड्याला खडे बोल सुनावले आहेत.

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हाती आहे. त्यामुळे मैदानात जे काही निर्णय घेतले जात आहेत त्यासाठी सर्वस्वी त्यालाच जबाबदार धरलं जात आहे. गुजरात टायटन्स विरुद्धचा हातात असलेला सामना मुंबई इंडियन्सला गमवण्याची वेळ आली. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला कमी धावांवर रोखण्यात अपयश आलं. इतकंच काय तर हैदराबादच्या फलंदाजांनी अक्षरश: पिसं काढली. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर उभा केला. त्यामुळे पहिल्या डावातच मुंबई इंडियन्सचा पराभव होणार हे निश्चित झालं होतं. पण तरीही मुंबईच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी झुंज दिली. तसेच पराभवातील धावांचं अंतर कमी करत रनरेटवर फारसा परिणाम होऊन दिला नाही. आता मुंबई इंडियन्सच्या या पराभवाचं जो तो त्याच्या परीने विश्लेषण करत आहे. यात सनरायझर्स हैदराबादचा माजी प्रशिक्षक टॉम मूडी याचाही समावेश आहे. बुमराहचा वापर व्यवस्थितरित्या न केल्याने हार्दिक पांड्याला खडे बोल सुनावले आहेत. “जसप्रीत बुमराह कुठे आहे? खेळ जवळपास संपला आहे आणि बेस्ट बॉलरच्या हाती फक्त एक षटक सोपवलं.”, अशी पोस्ट टॉम मूडी यांनी एक्सवर केली आहे.
सामन्यानंतर बोलताना टॉम मूडी म्हणाले की, “पॉवर प्लेमध्ये विकेटची आवश्यकता असते. बुमराह हा बेस्ट विकेट टेकर बॉलर आहे. तसेच कायम गरजेवेळी विकेट्स घेणारा असेल.त्याला संधी न मिळणं हेच मुंबईचं दुर्दैव आहे. हे काही बरोबर वाटत नाही. यामुळे विरोधी संघाला मोठी संधी मिळाली. आक्रमक फलंदाजी होत असताना बुमराहला षटक सोपवलं जायला हवं होतं”
“जगातील सर्वोत्कृष्ट बॉलर तुमच्या ताफ्यात आहे. पहिल्या दहा षटकात फक्त एकच षटक दिलं जातं. खरं तर पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराहने दोन षटकं टाकणं आवश्यक आहे. कारण त्याच्या षटकांनी नक्कीच फरक पडेल.”, असंही टॉम मूडी यांनी पुढे सांगितलं.
“पहिला टाईमआऊट झाला तेव्हा हैदराबादचे 6 षटकात 81 धावा होत्या. तेव्हाच कोच आणि सिनियर खेळाडूंनी संघाला विकेटची गरज आहे हा सल्ला द्यायला हवा होता. हे काम फक्त टीमचा नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराहच करू शकला असता.”, असंही टॉम मूडी याने सांगितलं.