Pakistan : पाकिस्तानचा या स्पर्धेतून पत्ता कट, आता 3 संघांमध्ये चुरस
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट टीमचा अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. नेपाळने साखळी फेरीतील दुसर्या सामन्यात पराभूत केल्याने पाकिस्तानला पुढील फेरीत पोहचण्यात अपयश आलं.
अंडर 19 नेपाळ वूमन्स क्रिकेट टीमसाठी 16 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरला. नवख्या नेपाळने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानवर 6 विकेट्स मात केली. पाकिस्तानने नेपाळला विजयासाठी 105 धावांचं आव्हान दिलं होतं. नेपाळने हे आव्हान 6 चेंडू राखून 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. नेपाळने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 105 धावा केल्या. नेपाळच्या या विजयानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. तर पाकिस्तानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. पाकिस्तानला या पराभवासह सर्वात मोठा झटका लागला.
पाकिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. या स्पर्धेतील एकूण 6 संघांना 2 गटात 3-3 नुसार विभागण्यात आलं. त्यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघाला 2-2 सामने खेळायचे होते. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून 9 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं.त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेपाळने धुव्वा उडवला. पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. मात्र नेपाळने पाकिस्तानला धुळ चारत विजय मिळवला. नेपाळ टीमने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक मारली. अशाप्रकारे ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि नेपाळने सुपर 4 फेरीत प्रवेश केला.
आता 2 जागांसाठी तिघांमध्ये चुरस
दरम्यान ए ग्रुपमधील शेवटचा सामना हा इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यात 17 डिसेंबरला होणार आहे. मात्र दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहचल्याने हा सामना औपचारिकता असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बी ग्रुपमधून कोणत्या 2 टीम या सुपर 4 मध्ये पोहचणार? हे मंगळवारी 17 डिसेंबरला ठरणार आहे. बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि यजमान मलेशियाचा समावेश आहे. श्रीलंकेने 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर 1 गमावलाय. बांगलादेशने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. तर मलेशियाची सुरुवात पराभवाने झाली. आता या ग्रुपमधील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेश विरुद्ध मलेशिया भिडणार आहे. मलेशियाचा नेट रनरेट हा अत्यंत खराब आहे. त्यामुळे मलेशियाची सुपर फेरीत पोहचण्याची शक्यता कमी आहे. मात्र मलेशियाने बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवला तर मलेशिया पुढच्या फेरीत पोहचू शकते. त्यामुळे या ग्रुपमधील तिन्ही संघांचं समीकरण हे या सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.
सुपर 4 आणि अंतिम सामन्यांचं वेळापत्रक
- बुधवार 18 डिसेंबर, पाचव्या/सहाव्या स्थानासाठी सामना, पाकिस्तान विरुद्ध बी ग्रुपमधील तिसर्या स्थानी असणारा संघ
- गुरुवार 19 डिसेंबर, सुपर 4 – ए 1 विरुद्ध बी 2
- गुरुवार 19 डिसेंबर, सुपर 4 – ए 2 विरुद्ध बी 2
- शुक्रवार 20 डिसेंबर, सुपर 4 – ए 1 विरुद्ध बी 1
- शुक्रवार 20 डिसेंबर, सुपर 4 – ए 2 विरुद्ध बी 1
- रविवार 22 डिसेंबर, फायनल
स्पर्धेतील सर्व सामने हे मलेशिया येथील क्वालालंपूरमधील बायुमास क्रिकेट ओव्हल स्टेडियममध्ये होणार आहेत.