U19 WC IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचं श्रेय कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत या खेळाडूला दिलं, म्हणाला…
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा सलग चौथा विजय आहे. न्यूझीलंडला 214 धावांनी पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारन याने आपलं मन मोकळं केलं आहे. तसेच विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहेत. स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. सुपर सिक्स फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताला हवा तसाच निर्णय न्यूझीलंडने घेतला. नाणेफेकीनंतर कर्णधार उदय सहारन याने याबाबत आपलं मत मांडलं होतं. तसाच निकाल सामन्यात लागला असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 295 धावा केल्या आणि विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं. पण न्यूझीलंडचा संघ 81 धावा करू शकला. या विजयात मुशीर खान याचा मोलाचा वाटा होता. शतकी खेळीसोबत त्याने दोन विकेट्सही घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी कर्णधार उदय सहारन याने त्याचं कौतुक केलं. तसेच आणखी एका खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं.
काय म्हणाला कर्णधार उदय सहारन?
“आम्ही चांगली कामगिरी करत आहोत आणि आम्ही चांगल्या मानसिकतेने खेळत आहोत. आम्ही आमचे सर्व प्लान अंमलात आणत प्रतिस्पर्धांना पाठी ढकललं आहे. या सामन्यात मुशीरने खरोखरच चांगली खेळी खेळली. मला मुलांना प्रेरित करण्याची गरज नाही, आम्ही सर्व चांगल्या मानसिकतेने खेळत आहोत आणि प्रत्येकजण त्यांची भूमिका चोख बजावत आहे. राजने चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला माहित होते की फिरकीपटूंना खेळपट्टीवर चांगली मदत मिळेल.”
राज लिंबानी याने 6 षटकं टाकली. त्यात दोन षटकं त्याने निर्धाव टाकत 17 धावा देत 2 गडी बाद केले. तर सौम्य पांडेने 10 षटकात 19 धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले. मुशीर खानने 2, नमन तिवारी आणि अर्शिन कुलकर्णीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस, मेसन क्लार्क
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे