मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत उदय सहारनच्या नेतृत्वात टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. सुपर सिक्स फेरीत न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुशीर खानने जबरदस्त खेळी केली. 126 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. तसेच गोलंदाजीत 3.1 षटक टाकून 10 धावा देत 2 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यापूर्वीच्या सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याच्या फॉर्मचं कौतुक होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुशीर खानच्या भावाची इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात निवड झाली आहे. सरफराज खानची टीम इंडियात निवड झाल्याने घरातही आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, मुशीर खानही चमकदार कामगिरी करत आहे. सामन्यानंतर त्याच्य या खेळीबाबत आणि सरफराज खानवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने त्यावर दिलखुलासपणे उत्तर दिलं.
शतकी खेळीनंतर कसं वाटतं आहे असा प्रश्न मुशीरला विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिलं की, “खरंच खूप छान वाटत आहे. दोन शतकं केल्याचा आनंद आहे. पुढेही मला अशीच फलंदाजी करायची आहे. या शतकांमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. खेळपट्टी एकदम संथ होती. आमच्या गोलंदाजानीही चांगली गोलंदाजी केली आणि विकेट मिळवल्या.”
भाऊ सरफराज खानला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी निवडलं आहे, त्यावर तुझं त्याच्याशी काही बोलणं वगैरे झालं का? या प्रश्नावर मुशीर खान म्हणाला की, “काल माझ्या भावाने मला फोन केला होता. त्याने सांगितलं की त्याची दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.” दोन विकेट्सही घेतल्या त्यावर काय प्रतिक्रिया, “मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच योग्य ठिकाणी टप्पा ठेवण्याचं काम करत होतो.”
न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. अगदी कर्णधार उदय सहारन याच्या मनासारखं झालं. भारताने जबरदस्त खेळी करत 50 षटकात 8 गडी गमवून 295 धावा केल्या आणि विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडचा संघ 28.1 षटकात 81 धावा करत तंबूत परतला. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडवर 214 धावांनी मोठा विजय मिळवला.