U19 World Cup : सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर बीडच्या सचिन धसने व्यक्त केल्या भावना, स्पष्टच म्हणाला की..
अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. सुपर सिक्समध्ये भारत नेपाळ यांच्यात झालेल्या सामन्यात बीडच्या सचिन धसची बॅट चांगलीच तळपली. सचिनपुढे नेपाळच्या गोलंदाजांना नांगी टाकावी लागली. त्याने ११६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्याने सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यानंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
मुंबई : अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तत्पूर्वी सुपर सिक्समध्ये नेपाळ विरुद्ध रंगलेल्या सामन्यात सचिन धस आणि उदय सहारन यांनी चांगली कामगिरी केली. सचिन धसने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. याच ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर सचिन धसने उदय सहारनसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी मिळून २१५ धावा केल्या. त्यांच्या या खेळीमुळे नेपाळचा पराभव निश्चित झाला होता. नेपाळसमोर विजयासाठी २९७ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण नेपळचा संघ ५० षटकात ९ गडी गमवून १६५ धावा करून शकला. टीम इंडियाने नेपाळचा १३२ धावांनी पराभव केला. या सामन्यातील महत्त्वपूर्ण खेळीसाठी सचिन धस याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारानंतर सचिनने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
“मला खूप बरे वाटते. काल सरांनी मला सांगितले की तुला समोर संधी मिळेल आणि मी ती संधी साधली. संघाची गरज होती आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मी उदयशी बोलत होतो. मी माझ्या बाबांना सांगितलं होतं की, ही खेळी तुमच्या वाढदिवसाची भेट आहे. माझा आदर्श सचिन तेंडुलकर आहे आणि म्हणूनच मी 10 नंबरची जर्सी घालतो.” असं सचिन धस याने सामन्यानंतर सांगितलं.
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. स्पर्धेतील एक कठीण पेपर असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला कसून सराव करावा लागणार आहे. तसेच मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाशी लढत असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला
नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता