ICC कडून वर्ल्ड कप वेळापत्रक जाहीर, 20 जानेवारीला टीम इंडियाची पहिली मॅच
Icc u19 world cup 2024 Schedule | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता काही महिन्यांनी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेला नववर्षात जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.
मुंबई | आयसीसीने मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला महाअंतिम सामना पार पडणार आहे. वर्ल्ड कपचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान एकूण 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात बांगलादेश विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना 20 जानेवारीला पार पडणार आहे.
16 संघ, 4 ग्रुप आणि 1 ट्रॉफी
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघाना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. एका ग्रुपमध्ये 4 संघांना ठेवण्यात आलं आहे.त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, बांगलादेश, आयर्लंड आणि यूएसचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड हे 4 संघ आहेत.सी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे आणि नामिबिया आहेत. तर डी गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळला स्थान देण्यात आलं आहे.
असा आहे रोडमॅप
एका ग्रुपमध्ये एकूण 3 टीम आहेत. प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील उर्वरित 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळेल. चारही ग्रुपमधून टॉप 3 संघ पुढील फेरीत पात्र ठरतील. तर चौथ्या स्थानी असलेली टीम स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यानंतर सुपर 12 राउंडला सुरुवात होईल. या सुपर 12 राउंडमध्ये प्रत्येक टीम दुसऱ्या ग्रुपमधील 2 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळेल. त्यानंतर सेमी फायनलसाठी 4 टीम निश्चित होतील. सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल या दोन्ही सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे.
टीम इंडियाचा वर्ल्ड कप कार्यक्रम
टीम इंडिया इतर संघांप्रमाणे या वर्ल्ड कपमध्ये एकूण 3 सामने खेळणार आहे. बांगलादेशनंतर टीम इंडिया 25 जानेवारी रोजी आयर्लंड तर 28 जानेवारी रोजी यूएसए अर्थात अमेरिके विरुद्ध सामना खेळेल. या वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे एकूण 5 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
अंडर 19 वर्ल्ड कपबाबत थोडक्यात
दरम्यान अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेला 1988 पासून सुरुवात झाली आहे. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन 1998 नंतर दर 2 वर्षांनी केलं जातंय. टीम इंडियाने या स्पर्धेत सर्वाधिक 5 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाने 3 आणि पाकिस्तानने 2 वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या चारही संघांनी प्रत्येकी 1-1 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळवलंय.