IND vs SA | टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, सचिन धस-उदय सहारनची धमाकेदार खेळी
U19 World Cup 2024 India vs South Africa Semi Final Highlights In Marathi | टीम इंडियाने पुन्हा एकदा अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.
बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून 48.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाची अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग दुसरी आणि एकून नववी वेळ ठरली. बीडचा सचिन धस आणि कॅप्टन उदय सहारन हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 245 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने झटपट 4 विकेट्स गमावल्या. आदर्श सिंह 0, मुशीर खान 4, अर्शीन कुलकर्णी 4 आणि प्रियांशू सहारन 5 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर सचिन धस आणि कॅप्टन उदय सहारन या दोघांनी टीम इंडियच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. संधी मिळेल तशी फटकेबाजी केली. अशाप्रकारे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची निर्णायक आणि गेमचेंजिग पार्टनरशीप केली.
सचिन शतकाच्या उंबरठ्यावर असताना आऊट झाला. सचिनने 95 बॉलमध्ये 96 धावांची खेळी करुन माघारी परतला. त्यानंतर अरावेली अविनाश 10 धावांवर आऊट झाला. त्यानंतर मुर्गन अभिषेक झिरोवर रन आऊट झाला . त्यामुळे सामन्यात आणखी रंगत आली. मात्र कॅप्टन उदयने राज लिंबानीसह सावरलं. मैदानात आलेल्या राजने कडक सिक्स उडवला. त्यामुळे पुन्हा टीम इंडियाने कमबॅक केलं. मात्र टीम इंडियाला विजयासाठी 1 धाव हवी असताना उदय 81 धावांवर रन आऊट झाला. मात्र राज लिबांनी याने नाबाद 13 धावा करत टीम इंडियाला विजयी केलं. तर नमन तिवारी झिरोवर नाबाद परतला.
तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेनेही चांगली झुंज दिली. दक्षिण आफ्रिकेने बॉलिंगसह फिल्डिंगही अप्रतिम केली. मात्र त्यांचा टीम इंडियासमोर निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन लुस आणि क्वेना माफाका या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया नवव्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये
The #BoysInBlue are into the FINAL of the #U19WorldCup! 🥳
A thrilling 2⃣-wicket win over South Africa U-19 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Ay8YmV8QDg#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/wMxe7gVAiL
— BCCI (@BCCI) February 6, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.