U19 World Cup : नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी स्वीकारताच टीम इंडियाला करून दिली ती आठवण
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. क्षणाचाही विचार न करता ह्यु वेबगेन याने फलंदाजी स्वीकारली. तसेच टीम इंडियाला डिवचत ती कटू आठवण करून दिली.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया देईल ते आव्हान पेलावं लागणार आहे. कारण नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीतही भारताला दक्षिण अफ्रिकेने दिलेलं आव्हान पेलावं लागलं होतं. अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामन्याची रंगत चढली होती. अखेर भारताने दोन गडी राखून सामना जिंकला. अशीच काहीशी स्थिती ही पाकिस्तान ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पाहायला मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने एक गडी राखून विजय मिळवला होता. आता भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्याचं आव्हान असणार आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि फलंदाजी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डिवचण्याची संधी सोडली नाही. सिनिअर टीमचं गेल्या वर्षभराचं कौतुक केलं. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाने दोन वेळेस आयसीसी स्पर्धेत पराभूत केलं आहे. एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि दुसरं वनडे वर्ल्डकप स्पर्धा..त्यामुळे भारतीय क्रीडा चाहत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
काय म्हणाला ह्यु वेबगेन?
“आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारू. थोडं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करू आणि बोर्डवर मोठी धावसंख्या उभारू. उपांत्य फेरीनंतर आम्हाला हवी तशी झोप मिळाली नाही. पण कालचं ट्रेनिंग सेशन चांगलं राहिलं. आता पुढे जाण्यास सज्ज आहोत. गेल्या १२ महिन्यात आमच्या सिनिअर खेळाडूंनी जी कामगिरी केली तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न असेल. संघात एक बदल केला असून चार्ली अँडरसनला संघात घेतलं आहे. तर टॉम कॅम्पबेलला आराम दिला आहे.”, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यु वेबगेन म्हणाला.
काय म्हणाला उदय सहारन?
“आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी तयार होतो. पण नाणेफेकीचा कौल जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी घेतली असती. आमच्या संघात कोणताच बदल केलेला नाही. आता आमच्या अंडर १९ वर्ल्डकप खेळण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्वजण ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे खेळात सर्वस्वी देण्याचा प्रयत्न असणार आहे.”, असं भारतीय कर्णधार उदय सहारन याने सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे